Photo Credit- Social Media छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार?
नाशिक : राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून यादरम्यान खातेवाटप होईल अशी चर्चा होती. मात्र अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा महायुतीचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीनाट्याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली. छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी उघड करत सुनील तटकरेव अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच मी खेळणे नाही, असे देखील भुजबळ म्हणाले होते. यानंतर आता माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांने टोलेबाजी केली आहे.
अजित पवार गटामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नाही. राष्ट्रवादीने यावेळी नाशिक जिल्ह्यातून भुजबळ यांच्याऐवजी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. छगन भुजबळ यांचे अन्न व नागरी पुरवठा हे आता धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे यांचे कृषी खाते हे आता नाशिकचे नेते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. यानंतर ओबीसी समाजाने छगन भुजबळ हे जो निर्णय घेऊ त्यांच्यामागे उभी राहण्याची भूमिका घेतली आहे. यानंतर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये परत असून त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे प्रथमच आपल्या सिन्नर मतदारसंघात आले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत देखील केले. तसेच माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भुजबळांनी पंतप्रधान व्हावे असे म्हणत टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय भाष्य केले. भुजबळ यांना अजित पवार यांनी राज्यसभेचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला नाही असे भुजबळ बोलले असल्याचे पत्रकार म्हणाले. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले, “शब्द पूर्ण होईल ना. सरकार स्थापन होऊत आतातरी चार दिवस झाले आहेत. राज्यसभा कुठे पळून चालली आहे. दम तर काढला पाहिजे ना.” असा टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावला.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यम प्रतिनिधींनी तुम्हाला वाटते का भुजबळांनी राज्यसभेत जावे? यावर कोकाटे म्हणाले, “त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. मला काय वाटते याला काही अर्थ नाही. मला वाटते भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. मला काय वाटते ते देशामध्ये, जगामध्ये होईलच असे नाही.” असा टोला अजित पवार गटाचे आमदार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला आहे.