भाजपा पक्षाने अखेर निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय दिला नाही. याचकारणाने संपूर्ण बौद्ध समाजाची नाराजी आशा आशयांचे बॅनर सध्या कामोठे वसाहतील लावण्यात आले आहेत. अनामिक नावाने लावण्यात आलेले हे बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने कामोठे वसाहतीत बौद्ध समाजाच्या उमेदवारांना निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व दिले नाही असा आरोप या बॅनरमध्ये केला.
या बॅनर बाबत अधिक माहिती घेण्यासाठी भाजपासोबत युती करून निवडणूक लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष ऍड. मंगेश धिवार यांच्याशी संपर्क साधला. हा खोडसाळपणा करण्यासाठी आणि भाजपा आणि बौध्द समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोणीतरी हे बॅनर लावले आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या बौद्ध समाजाच्या उमेदवारांना पडण्याचं काम आशा प्रकारच्या प्रवृत्तींनी केले असल्याचे वक्तव्य केले आहे.
कामोठे वसाहतीमधील प्रभाग 12 मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेकरिता आरपीआय पक्षाच्या प्रभाकर कांबळे यांना भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 11 मधील अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी राखीव जागेवर नीलम मोहिते, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जातीच्या महिला उमेदवा्रांसाठी राखीव जागेवर भाजपाकडून हेमलता गोवारी यांना उतरविण्यात आले होते. यापैकी प्रभाग क्रमांक 13 मधील हेमलता गोवारी वगळता भाजपाच्या इतर दोन्ही उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपा उमेदवारांचा पराभव झाला असला तरी या ठिकाणी विरोधात विजयी झालेले उमेदवार अनुसूचित जातीतीलच आहेत, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान हे सगळं भाजपाच्या विशेषत: महायुतीच्या विरोधात केलेलं कटकारस्थान असल्याचं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.






