आम आदमी पक्षाला मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश (File Photo : BJP)
पिंपरी : भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने नवे नेतृत्व सामील झाले असून, आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आकुर्डी विभागप्रमुख प्रदीप महाजन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह औपचारिक प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप, युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, आमदार उमा खापरे, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, उद्योजक आघाडी प्रमुख अतुल इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये चेतन गौतम बेंद्रे, प्रा. अरुणा सतिश सीलम, रोहित सरनोबात, सी. एम. ए. कुणाल वक्ते, डॉ. प्रशांत कोलावले, खुशाल काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला. यामध्ये प्रदीप महाजन, देवानंद कपूरे, अमोल बोबंले, सुनील साबळे, राजवर्धन बेंद्रे, राज बेंद्रे, शिवकुमार गुप्ता, अर्पित सुतार, प्रतिक वाघमारे, विशाल डोंगरे यांनी प्रवेश केला आहे.
भाजप नेत्यांनी या सर्व नव्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत, येत्या काळात पक्षाच्या विस्तार व विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान अपेक्षित असल्याचे नमूद केले. प्रवेशकर्त्यांनी भाजपच्या विकासोन्मुख विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंगण्यात मोठे खिंडार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही अनेक नेतेमंडळींकडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला जात आहे. त्यात आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंगण्यात मोठे खिंडार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारेंसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात तालुक्यातील 16 सरपंच, नगरपरिषदेतील सर्व 6 नगरसेवक आणि 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी पक्षत्याग केला. या पक्षप्रवेशामुळे हिंगण्यात भाजपचे बळ वाढणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसणार आहे.