फोटो - सोशल मीडिया
मुंबई : देशामध्ये निवडणूकांबाबत ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. या समितीने एक देश, एक निवडणूक याबाबत अहवाल सादर केला. या अहवालावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे देशामध्ये आता निवडणूकीची नवीन पद्धत समोर येण्याची शक्यता आहे. यावरुन राजकारण सुरु असून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. एक देश एक निवडणूक यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या एक देश एक निवडणूक या निर्णयाचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतात. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा, वेळ, मनुष्यबळ हे सगळं खर्ची होतं. त्याबरोबरच आचारसंहिता लागल्याने अनेक महत्त्वाची कामं थांबतात आणि विकासाचा वेग मंदावतो. यामुळे एक देश एक निवडणूक हा देशासाठी मोठा निर्णय असणार आहे, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये या निर्णयामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर देखील मुख्यमंत्री शिंदेंनी खरपूस समाचार घेतला आहे. विरोधकांना सुनावताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांना विरोध करण्याची सवय आहे. मुळात या निर्णयाला विरोध करण्याचं कोणतेही कारण नाही. यामुळे देशाचा पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा निर्णय देशाच्या हिताचा निर्णय आहे. अशा निर्णयाला विरोध होऊ नये, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
एक देश एक निवडणूक अहवाल मंजूर
‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “राजकीय स्पेक्ट्रममधील मोठ्या संख्येने राजकीय पक्षांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ उपक्रमाला खरोखर पाठिंबा दिला आहे. जेव्हा ते उच्चस्तरीय बैठकांशी संवाद साधतात तेव्हा ते त्यांचे इनपुट देतात. अतिशय संक्षिप्त पद्धतीने आणि बऱ्याच स्पष्टतेसह लोकशाही आणि राष्ट्राला प्रभावित करणाऱ्या बाबींवर आमचा सरकारचा विश्वास आहे, हा एक निर्णय आहे जो आपल्या देशाला बळकट करेल…” असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.