पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही (फोटो - सोशल मीडिया)
पिंपरी : “शिवसेना संघटनेत पदे घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. सद्यस्थितीला सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून, आजपासून सर्व पदाधिकारी केवळ ‘प्रभारी’ म्हणून काम करतील. पुढील ३० दिवसांत त्यांच्या कामाचा आढावा घेऊनच कोणाला पदावर कायम ठेवायचे आणि कोणाला डच्चू द्यायचा, याचा निर्णय घेतला जाईल,” असा कडक इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.
थेरगाव येथील मोरया बँकेट हॉलमध्ये आयोजित मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, शहरप्रमुख निलेश तरस यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संघटना महत्त्वाची, व्यक्ती नाही!
उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः झोकून देऊन काम करत आहेत, त्यांचा आदर्श शिवसैनिकांनी ठेवावा. “संघटना कोणा एका व्यक्तीपेक्षा मोठी असते. पुढील महिनाभर मतदारयाद्या तपासणी आणि जनसंपर्काच्या कामावर आमचे बारकाईने लक्ष असेल. जे पदाधिकारी सक्रिय राहतील, त्यांनाच संधी मिळेल; अन्यथा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील ३० दिवस ‘कसोटी’चे
खासदार श्रीरंग बारणे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “पुढील तीन वर्षे कोणतीही निवडणूक नसल्याने ही संघटना बळकट करण्याची मोठी संधी आहे. केवळ पदासाठी पक्षात राहू नका, तर शिवसेनेच्या विचारांशी एकरूप होऊन काम करा. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनेकडून ताकद दिली जाईल.”
उद्योजकांच्या समस्यांबाबत कठोर भूमिका
पक्षीय आढाव्यासोबतच उद्योगमंत्री म्हणून सामंत यांनी स्थानिक समस्यांवर भाष्य केले. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना MNGL गॅस पुरवठ्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. “गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून उद्योगांना वेठीस धरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे,” असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
अशोक खरात प्रकरणावर स्पष्टीकरण
अशोक खरात सीडीआर प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले की, संभाषणाचा गैरफायदा घेऊन चुकीची कृत्ये करणाऱ्यांचे समर्थन कोणताही नेता करणार नाही. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची भूमिका शिवसेनेची आहे.
मेळाव्याला उपस्थित प्रमुख मान्यवर
या बैठकीस जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढारकर, शरद हुलावळे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, शहरप्रमुख श्वेता कापसे, रामभाऊ सावंत व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sambhaji Nagar 2026 : संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप






