भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार...” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
माध्यमाशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता हे “कलंकित आमदार” असल्याची थेट टीका केली. २० जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्वतःच्या सहीनिशी नरेंद्र मेहता यांना “भूमाफिया नरेंद्र मेहता” असा उल्लेख असलेली नोटीस दिल्याचा दावा सरनाईक यांनी केला. त्या नोटीसमध्ये हे शब्द स्पष्टपणे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरनाईक यांनी विधानसभेत नरेंद्र मेहता यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत, मेहतांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मांडली. खंडणी, बलात्कार, दमदाटी तसेच पर्यावरण हानीसंदर्भातील तब्बल २० ते २५ गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप त्यांनी केला. “मी गेल्या १६ वर्षांपासून आमदार आहे, मात्र माझ्यावर असे गंभीर गुन्हे नाहीत,” असे सांगत सरनाईक यांनी स्वतःची तुलना केली.
भाजपकडून दिल्या जात असलेल्या उमेदवारीवरही सरनाईक यांनी जोरदार टीका केली. मेहतांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या व्यक्तींना नगरसेवक पदाची तिकिटे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बीएसयूपी योजनेतील गरीबांची घरे लाटल्याचा आरोप असलेल्या माजी नगरसेवकांना, पाच वर्षांची शिक्षा झालेल्या माजी नगरसेविकेला आणि पोस्कोसारखा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांना भाजपच्या नावावर तिकिट देण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. “लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर विश्वास ठेवून मतदान करतात, मात्र भाजपकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकिटे दिली जात आहेत. या सगळ्यांचा नेता कोण, तर नरेंद्र मेहता,” असा घणाघाती आरोप सरनाईक यांनी केला.
युतीबाबतही सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमची युती भाजपाशी आहे, नरेंद्र मेहताच्या सेव्हन इलेव्हनशी नाही,” असे सांगत त्यांनी मिरा–भाईंदरमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापनेसाठी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. “मी बजरंगी भाईजान आहे. माझ्या शेपटीला आग लावली आहे. आता हीच शेपटी नरेंद्र मेहतांच्या भ्रष्टाचाराची लंका जाळेल,” असा आक्रमक इशारा देत सरनाईक यांनी आगामी निवडणुकीत जोरदार लढ्याचे संकेत दिले. या आरोपांमुळे मिरा–भाईंदरमधील निवडणूक राजकारण अधिकच तापण्याची शक्यता असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






