मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण २८ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ ते २७ मध्ये प्रत्येकी चार सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’) निवडले जातील. प्रभाग क्रमांक २८ मध्ये तीन सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’) निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग १ ते २७ मधील प्रत्येक मतदाराला चार वेळा मतदान करणे आवश्यक आहे. तसेच प्रभाग २८ मधील मतदारांना तीन वेळा मतदान करावे लागेल. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे एक मत द्यावचं लागणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका जागेसाठी एकापेक्षा जास्त मते देता येणार नाहीत. प्रत्येक उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर संबंधित लाल दिवा पेटेल. चारही (किंवा तीन) जागांसाठी मतदान पू्र्ण झाल्यानंतर बीप असा आवाज येईल, म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजणार.
चार सदस्यांच्या संख्येनुसार प्रभाग रचना मंजूर असून प्रत्येक मतदाराला चार मत द्यावीच लागणार आहेत. मग ते उमेदवार असो की नोटा. लोकशाहीचा अधिकार बजावण्यासाठी ईव्हीएम बटण चार वेळा दाबणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मतदान केंद्रातून मतदारांना बाहेर पडता येणार नाही, अशी राज्य निवडणूक आयोगाची गाइडलाइन आहे. मतदान एकदा, दोनदा, तीन नव्हे तर चार वेळा करावे लागेल अशी स्पष्ट नियमावली आहे.
जर एखाद्या जागेसाठी कोणताही उमेदवार पसंत नसेल. तर त्या जागेच्या शेवटी ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय उपलब्ध असणार आहे. प्रभाग १ ते २७ मधील मतदारांनी एकूण ४ मते, तर प्रभाग २८ मधील मतदारांनी एकूण ३ मते देऊन लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.
प्रभागानुसार चार वेळा मतदानाच्या प्रक्रियेत सर्वसामान्यांचं मत नक्की कोणाला जाणार? सध्याच्या बदलत्या आणि अनिश्चित राजकारणामुळे नेमकं कोणाला मतदान करावं, याबाबत अनेक मतदारांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं पहायला मिळत आहे. शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे. बहुतेक मतदारांना ही प्रक्रिया कशी असते? हे माहित नाही. मतदान केंद्रात गेल्यावर पहिले मत एका पक्षाच्या उमेदवाराला दिले. दुसरे मत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला दिले. तिसरे आणि चौथे मत अन्य कोणाला द्यायचे असेल तर काय करायचे. यावर मतदार प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. अनेक मतदारांना तर आपला प्रभाग क्रमांक कोणता हेच माहीत नाही. आपले मतदान केंद्र कुठे हे सुद्धा माहीत नाही.
‘अ’ जागेसाठी १ मत
‘ब’ जागेसाठी १ मत
‘क’ जागेसाठी १ मत
आणि ‘ड’ जागेसाठी १ मत
‘अ’ जागेसाठी – पांढरा रंग
‘ब’ जागेसाठी – फिकट गुलाबी
‘क’ जागेसाठी – फिकट पिवळा
‘ड’ जागेसाठी – फिकट निळा






