संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी वाल्मिक कराडसाठी बीड पोलीस ठाण्यात नवीन बेड आणल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे(फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत होते. आरोपींना अटत होत नसल्यामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात होता. सर्व पक्षीय मूक मोर्चा देखील काढण्यात आला. तसेच मस्साजोग गावाच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले. या प्रकरणामध्ये आरोपी असलेला 20 दिवस फरार झाल्यानंतर वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडी ऑफिसला सरेंडर केले. यानंतर त्याला बीडला नेण्यात आले असून यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
वाल्मिक कराड हा सध्या केजमधील सीआयडी ऑफिसमध्ये आहे. त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली असून काही काळ त्याला ऑक्सिजन देखील लावण्यात आला होता. त्याचबरोबर वाल्मिक कराडला 14 दिवसांचा कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता बीड पोलीस ठाण्यामध्ये पाच नवीन पलंग मागवण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात काल रात्रीपासून जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर यावरुन शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला असून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन नवीन पलंग मागवल्यावरुन टीका केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. सोशल मीडियावरील रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यामध्ये जोरदार गाजत असताना देखील पोलिसांच्या हाती आरोपी लागत नव्हते. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली. घटनेच्या तब्बल 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा शरण आला. सध्या त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे समोर येत आहे. मग तो पुण्यात आला. या तीनही राज्यात स्वतःच्या कारने तो फिरला असे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो काल पुण्यात स्वतःच्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये गेला आणि शरण आला.