समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी आरएसएस आणि मोहन भागवत यांच्यावर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
RSS 100 Years : मुंबई : यंदा विजयादशमी आणि गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने राजकीय चर्चांना आणि टीकांना उधाण आले आहे. तसेच यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकपूर्ती सोहळा असल्यामुळे जोरदार राजकीय चर्चा सुरु आहेत. नागपूरमधील रेशीमबाग या संघ कार्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. तर कॉंग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे.
गांधी जयंतीनिमित्त, महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करताना भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अबू आझमी यांनी जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यात आरएसएसचे कोणतेही योगदान नाही आणि आजच्या मुलांना हे सत्य कळले पाहिजे. भाजप जे काही करेल ते मुस्लिमांविरुद्ध असेल. त्यांनी एकाही मुस्लिमाला तिकीट दिलेले नाही किंवा त्याला मंत्री बनवलेले नाही. मुस्लिमांविरुद्ध सतत विष पसरवले जात आहे.” अशी जोरदार टीका अबू आझमी यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते पुढे म्हणाले की, मुलांना आधुनिक शिक्षण दिले पाहिजे आणि देश स्वतंत्र कसा झाला हे शिकवले पाहिजे. “आज जग खूप प्रगती करत आहे, परंतु आपण अजूनही हिंदू-मुस्लिम वादात अडकलो आहोत, जे द्वेषाला खतपाणी घालतात. स्वातंत्र्यासाठी कोणी बलिदान दिले हे मुलांना कळले पाहिजे आणि द्वेष पसरवणाऱ्यांबद्दल सत्य जाणून घेतले पाहिजे.” आरएसएसवर निशाणा साधताना आझमी म्हणाले की, ही संघटना संविधानाचे पालन करत नाही आणि वर्षानुवर्षे तिरंगा फडकवत नाही. “हे लोक संपूर्ण देशाला एकाच रंगात रंगवू इच्छितात. आज प्रत्येक मुलाला संविधान वाचण्याची गरज आहे जेणेकरून देशात शांतता आणि सौहार्द नांदेल.” असे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इतिहासातील पैलूंची आठवण करून देताना अबू आझमी म्हणाले, “आम्ही वाचले आहे की तुरुंगात असताना संघाचे सदस्य ब्रिटिशांना पत्र लिहित असत, ‘जर त्यांना सोडण्यात आले तर ते गांधीजींची स्वदेशी चळवळ थांबवतील.’ त्यांना ब्रिटिशांकडून पेन्शनही मिळत असे. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांच्या योगदानाबद्दल आजच्या लोकांना सत्य सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” अबू आझमी यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आझमी यांच्या टीकेमध्ये केवळ भाजप आणि संघाला लक्ष्य केले नाहीत तर समाजातील वाढत्या द्वेषाकडे आणि शिक्षणाच्या महत्त्वाकडेही लक्ष वेधले आहे. गांधी जयंतीनिमित्त दिलेली ही विधाने मानवता, समानता आणि देशाच्या इतिहासाचे स्मरण करण्याचा संदेश देखील देतात. की मुलांना सत्य आणि संविधानाबद्दल शिक्षित करूनच समाजात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करता येतो.