फोटो - सोशल मीडिया
मुंबई : सध्या देशभरामध्ये ‘एक देश एक निवडणूक’ या निर्णयाची चर्चा रंगली आहे. सत्ताधारी नेते अहवालाचे स्वागत करत असून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. देशामध्ये अवघ्या 4 राज्यांच्या निवडणूका एकत्र घेणे देखील आयोगाला जमत नसताना हा निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत विरोधकांनी मांडले जात आहे. तर ही पुढच्या निवडणूकीची तयारी सत्ताधारी मोदी सरकारकडून केली जात असल्याची टीका देखील केली जात आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कडक शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकारकडून 2029 ची तयारी
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावरुन सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “काल जी काही घोषणा केलेली आहे ‘वन नेशन वन इलेक्शन’ची ती मोदी सरकारकडून 2029 ची तयारी आहे. जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत. जम्मू सारख्या राज्यात तीन – तीन वर्षे ते निवडणूका घेऊ शकले नाहीत त्यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’चा फंडा आणावा हे आश्चर्यकारक आहे. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येक राज्यातलं वेगळं हवामान आहे. संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. आधी महानगरपालिकेच्या निवडणूका राज्याच्या निवडणूका एकत्र घेऊन दाखवा. ‘वन नेशन वन इलेक्शन’ हे लोकशाही विरोधी आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
देशाच्या विरोधात असणारी ही कृती
पुढे संजय राऊत म्हणाले की, “भविष्यात त्यांचा ‘नो इलेक्शन’चा नारा असू शकतो. आम्ही सगळे यावर बसून चर्चा करू. इंडिया आघाडीत चर्चा करू. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं. ते अर्थमंत्री कधी झाले. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी नवीन घटना लिहू नये. आमचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णतः विरोध आहे. देशाच्या विरोधात असणारी ही कृती आहे. देशाच्या दृष्टीने हे काहीही फायदा नाही. पैसे वाचवायचे आहेत तर देशातली लूट थांबवा निवडणुकातील खर्च दिसतोय पण लुट दिसत नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.