खासदार संजय राऊत यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महायुतीवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा करुन संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करुन संघाच्या सेवा कार्याचे मनभरुन कौतुक केले. तसेच संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुणाल कामरा अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्या कामांची अपेक्षा आहे असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. पुढे राऊत म्हणाले की, “राज ठाकरे यांची लोकसभेची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. ती भाजपच्या सोयीची होती, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे. मराठी भाषेसाठी जर तर कानखाली आवाज काढणार असतील तर जरुर काढला पाहिजे. मराठी माणसांचं संघटन भारतीय जनता पक्षाने उद्धस्त केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी कानखाली मारायचं ठरवलं असेल तर नक्की आम्ही सोबत आहोत. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका कोणी घेऊ नये,” असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या या वक्तव्याच्या खासदार राऊतांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “हा शोध त्यांनी कुठून लावला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान काय याबद्दल त्यांनी एकदा ब्रिफिंग घेतलं पाहिजे. बेड्या तोडल्या म्हणजे नेमकं केलं काय? लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचे जोपर्यंत बंद होत नाही तो पर्यंत या देशाच्या लोकांची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त करत आहेत. भ्रमिष्ठ आणि वेडे करत आहेत. हा देश एकदिवस जगामध्ये वेड्यांचा देश आणि खोटारड्यांचा देश म्हणून यादीमध्ये येईल,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या पोलिसांकडे हजर होण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कुणाल कामरा याला ठार मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. असा माणूस मंत्रिमंडळामध्ये कसा असू शकतो. दुसरा कोणी असता तर पोलिसांनी त्याला उचलला असता. मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोक्का लावला असता. टायरमध्ये घालून मारेल आणि जिवंत कसा राहतो अशी वक्तव्य मंत्रिमंडळातील लोकांनी कुणाल कामराबाबत केली आहेत. पण, गृहमंत्री हे बधिर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.