अमित शहा हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, असे संजय शिरसट यांनी म्हटले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या पक्षांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्यांनी होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडत आहे. मात्र त्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी अमित शाह हे राज्यातील तीन पक्ष चालवतात अशी टीका केली. राऊत म्हणाले की, अमित शाह 3 पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा मोठा विक्रम आहे. अधूनमधून ते रामदास आठवले यांचा देखील पक्ष चालवतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर आता शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. पण त्याचा तुम्हाला त्रास काय होत आहे? नालायक हो, तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळाभेट करत होता तेव्हा काय झालं? आम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना मानतो. त्यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
मनसे नेते राज ठाकरे व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतरांची मदत घेतली तर काय झालं? एकनाथ शिंदे हे संवाद ठेवणारे नेते आहेत. ज्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही, ते लोक दुसऱ्यांच्या पक्षात डोक घालण्याचं काम करत आहेत, असं सांगतानाच उदय सामंत हे चांगले नेते आहेत. त्यांच्या संदर्भात सगळ्यांना माहीत आहे. आम्ही उदय सामंत यांच्यासोबत आहोत, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडत आहे. यावर शिंदे गटाने निशाणा साधला आहे. शिरसाट म्हणाले की, आज त्यांचा निर्धार मेळावा नाही. तर पक्ष बचाव मेळावा आहे. ज्यांच्यामुळे पक्ष डॅमेज होत आहे, अशा लोकांना त्यांनी दूर ठेवलं आहे. त्यांना त्यांची जागा दिसली पाहिजे म्हणून असं केलं असेल. अंधारे बाईंना असं वाटतं की या पक्षाला मीच जन्म दिलाय आणि भास्कर जाधव तर त्या पक्षात राहतील की नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना विरोधीपक्ष नेत्याच गाजर दाखवण्यात आलं. यांच्या पक्षाचं विसर्जन देखील नाशिकमध्ये होईल, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.