माळेगाव नगरपंचायत निवडणूक (फोटो- सोशल मिडिया)
माळेगाव नगरपंचायत निवडणूक होणार रंगतदार
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
तिकीट न मिळालेल्या काही इच्छुक अपक्ष लढणार
माळेगाव/प्रदीप जगदाळे: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीचा तापलेल्या वातावरणात राष्ट्रवादी जनमत आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून गावात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे. आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने या आघाडीतील उमेदवार उमेदवारी अर्ज माघारी घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आघाडीकडून अधिकृत तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांनी अखेर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असून फॉर्म भरल्यानंतर हे उमेदवार थेट आऊट ऑफ बारामती झाल्याची चर्चा गावभर रंगली आहे. “मीच निवडून येणार” असा अनेकांचा आत्मविश्वास पाहूनच काहींनी अपक्ष रिंगणात उतरत आघाडीला चांगलीच गोची करून ठेवली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, या अपक्षांनी फॉर्म भरला नसता तर या प्रभागात बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता बलवत्तर होती. मात्र आता किती अपक्ष उमेदवार फॉर्म मागे घेतात आणि किती जण शेवटपर्यंत रिंगणात ठाम राहतात, यावरच निवडणुकीच्या अंतिम समीकरणांचा निर्णय होणार आहे.
Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
त्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रचार शुभारंभ असून ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज दिवसभरात माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या काय आणि कोण कोण रिंगणात कायम राहणार यावर सर्वांचेच डोळे खिळले आहेत. एकूणच, माळेगावमध्ये राष्ट्रवादी जनमत आघाडीचा वेगवान प्रचार, अपक्षांचा अनपेक्षित पवित्रा आणि गावातील वाढती उत्सुकता यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट
माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात अनपेक्षित वळण घेतलं आहे. तब्बल तीन दशके संघर्षात असणारे प्रदेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे अखेर एकाच व्यासपीठावर आले आहेत. या ऐतिहासिक मनोमिलनानं माळेगाव निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणालाच कलाटणी दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून तावरे–पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर होते.
मात्र, पडद्यामागील चर्चेनंतर दोन्ही गटांनी ‘एकजूट’ दाखवत पुन्हा हात मिळवला आहे. आरोप–प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुटकेचा निःश्वास आणि नव्या जोमाचा उत्साह दिसून येत आहे.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मैदानात असताना या मनोमिलनानंतर राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगात आली असून मतदारसंघात नवे राजकीय गणित मांडले जात आहे.






