शरद पवार mva मधून बाहेर पडण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी हालचाल
स्थानिक पातळीवरील मतभेद झाले तीव्र
शरद पवार गट मविआमधून बाहेर पडण्याची शक्यता
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप, नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील मतभेद तीव्र होत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाविकास आघाडीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात राष्ट्रवादीकडे मजबूत संघटनात्मक बांधणी असून अनेक प्रभागांत पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत. मात्र, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेशी जागावाटपावरून सातत्याने मतभेद होत आहेत. विशेषतः ‘विजयी उमेदवार देण्याची क्षमता’ आणि स्थानिक नेत्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीतून पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढत देण्याचा विचार गांभीर्याने सुरू असल्याचे सांगितले जाते.
शरद पवार यांची राजकीय शैली नेहमीच परिस्थितीचा बारकाईने अंदाज घेऊन निर्णय घेणारी राहिली आहे. कोल्हापूरसारख्या सहकार, शिक्षण आणि स्थानिक नेतृत्वाला महत्त्व असलेल्या शहरात स्वतंत्र आघाडी उभी केल्यास निर्णायक भूमिका बजावता येईल, असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा दावा आहे. संभाव्य तिसऱ्या आघाडीत स्थानिक पातळीवरील अपक्ष, लहान पक्ष तसेच नाराज नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात असले तरी, राष्ट्रवादीच्या हालचालींमुळे आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. जर राष्ट्रवादीने खरोखरच वेगळी चूल मांडली, तर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक त्रिकोणी किंवा चौरंगी लढतीत रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे. एकूणच, कोल्हापूर महापालिका निवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एवढ्यावर मर्यादित न राहता, तिसऱ्या आघाडीमुळे अधिक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणि मनसेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात आज नव्या युतीची सुरुवात झाली आहे. मात्र युतीची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे युती झाली असली तरी पक्षात सुरू असलेली गळती कशी थांबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






