जयंत पाटलांच्या 'त्या' मागणीवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...
पुणे : राज्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे. युतीची चर्चा सुरु असताना दोन्ही राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांच्या मागणीवर विचार करू, असे सांगितले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. 26 व्या वर्धापन दिनी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार यांच्यापूर्वी भाषण करणाऱ्या जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, ‘सत्तेची चिंता करू नका ती येते-जाते. देशाच्या हितासाठी कायम ठाम भूमिका घेतली आहे. जयंत पाटलांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांनी सध्या केलेल्या मागणीवर विचार करू’.
दरम्यान, कोण पक्षातून गेलं याची चिंता करू नका. लोकं येतात-जातात. त्याची चिंता करू नका. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही पुन्हा सत्तेत येणार. तसेच पहलगाम हल्ल्यावर आम्ही कधीही टीका केली नाही. 2-3 महिन्यांत निवडणुका लागतील. त्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावं, असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देणारा पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देणारा पक्ष आहे आणि हीच पक्षाची खरी ओळख आहे. अनेक कार्यकर्ते कष्ट करत करत आज मंत्री, खासदार, उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. मात्र, आज अनेक जण हयात नाहीत, पण त्यांच्या योगदानाची आठवण ठेवावी लागेल, असे ते म्हणाले. सत्ता ही येणारी-जाणारी गोष्ट असली तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि त्याग कायम स्मरणात राहतो. “रात्री उशिरापर्यंत काम करणारे कार्यकर्ते, लहान घरात राहणारे लोकप्रतिनिधी — हीच पक्षाची ताकद आहे,” असे सांगत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान दिला.
वर्धापन दिनी भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदावरुन मुक्त करावे अशी मागणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी मला सात वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देणे देखील आवश्यक आहे. यानिमित्ताने सर्वांच्या समोर मी शरद पवारांना विनंती करेल की मला प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.