स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला धक्का; 'हा' नेता करणार शिवसेनेत प्रवेश (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या गोटात घेण्याचा सपाटा सुरूच असून, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शारंगधर देशमुख यांनी शुक्रवारी (दि.६) ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर पुढील काही दिवसांत शारंगधर देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. ही घडामोड काँग्रेससाठी मोठा धक्का मानली जात असून, आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला यामुळे मोठा फायदा होणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: “… हे तर शुभ बोल नाऱ्या असे म्हणावे लागेल”; संजय शिरसाटांनी नेमके कोणाला डिवचले?
दरम्यान, काँग्रेस आमदार आणि कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे देशमुख हे प्रमुख शिलेदार असल्यामुळे या प्रवेशामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
राजेश क्षीरसागर यांनी केला होता दावा
काही दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दावा केला होता की, काँग्रेसचे केवळ दहा नव्हे तर तब्बल ३५ नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे प्रवेश घडवले जातील आणि विरोधकांचे बस्तान उध्वस्त केले जाईल, असेही त्यांनी ठामपणे म्हटले होते. राजकीय रणनीती स्पष्ट करताना क्षीरसागर म्हणाले, “या वेळेस कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र येणार असून, एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर नेता आमच्या पाठीशी असल्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडून आणल्याशिवाय राहणार नाही.”
…यावेळी ही चूक होणार नाही
“या आधी दोन वेळा शिवसेनेने माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या. आमचे १५ उमेदवार शंभरपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, तर २२ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी ही चूक होणार नाही. कोल्हापूर महापालिकेला शिवसेनेचा पहिला महापौर मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. आता येणाऱ्या दिवसांत आणखी कोणते नेते कुठल्या गोटात शिंदे गटात सामील होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Samruddhi Highway : एकनाथ शिंदेंनी घेतलं हातात स्टेरिंग; समृद्धी महामार्गावरुन महायुतीची गाडी सुसाट