समृद्धी महामार्गावर एकनाथ शिंदे यांनी ड्रायव्हिंग करत गाडी चालवली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेला महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग अखेर पूर्ण झाला आहे. नागपूर ते मुंबई असा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण करणारा या महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-नागपूर असा प्रवास अत्यंत सुलभ आणि सुसाट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. त्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी एकसाथ प्रवास केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातामध्ये स्टेरिंग घेतले. त्याच्या शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. त्याच गाडीमध्ये अजित पवार हे देखील मागे बसले होते. यामुळे महायुतीची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली. मागील काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संवाद नसल्याची खंत व्यक्त केली होती. यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित समृद्धी महामार्गावर प्रवास केला आहे. त्याचबरोबर परतीच्या प्रवासावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली आहे. तसेच मला ड्रायव्हिंगचा शौक आहे असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” या महामार्गावरुन निसर्गसौंदर्य दिसत असले तरी देखील या महामार्गावर कोणीही थांबू नये. यामुळे कुठेही थांबण्यासाठी जागा करण्यात आलेली नाही. हा महामार्ग आहे. येथे गाड्या सुसाट असतात. त्यामुळे कोणीही वाहन चालवताना थांबू नये,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महायुतीच्या नेत्यांनी समृद्धी महामार्गावर केलेला हा एकत्रित प्रवास राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काही काळजी करू नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली असून तिघेही ती तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत.”अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करुन उद्घाटन करण्यात आले आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा ७६ किमी लांबीचा हा शेवटचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्यात आला असून यापुढे मुंबई ते नागपूर प्रवास ७ ते ८ तासांत पूर्ण करता येईल. हा रस्ता देशातील सर्वात हाय-टेक महामार्ग म्हणून बांधण्यात आला आहे. एक डोंगर आणि दुसऱ्या डोंगरातील अंतर भरून काढण्यासाठी २० मजली इमारती इतका उंच एक व्हायाडक्ट (पूल) बांधण्यात आला. एकूण दोन व्हायाडक्ट आहेत. एकाची उंची ९१० मीटर आहे आणि दुसरा १२९५ मीटर आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान देशात प्रथमच उच्च दाबाच्या पाण्याच्या धुक्याची व्यवस्था वापरली गेली आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन चालवता येणार आहे.