शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता कायदेशीर व घटनात्मक वळण लागले आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी १३ जुलै रोजी संजय दिना पाटील यांच्यासह सहा बंडखोर खासदारांना पत्र पाठवत त्यांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर आक्षेप नोंदवला आहे. केवळ काही खासदारांनी दावा केल्याने पक्षाचे विलीनीकरण वैध ठरत नसल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे विलीनीकरणाचा दावा केला आहे. मात्र, पक्षाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ‘कॅव्हिएट’ दाखल करून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती. सध्या या प्रकरणावर अंतिम निर्णय झालेला नसून लोकसभा अध्यक्षांसमोर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.
त्यात आता अरविंद सावंत यांचे पत्र हे बंडखोर खासदारांना दिलेला स्पष्ट कायदेशीर इशारा मानला जात असून, पक्षांतरबंदी कायदा आणि विलीनीकरणाच्या घटनात्मक प्रक्रियेबाबत या प्रकरणातून महत्त्वाचा न्यायनिकष तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अरविंद सावंतांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे –
– विलीनीकरण हे केवळ विधिमंडळातील गटाचे नसून मूळ राजकीय पक्षाचे असते.
– मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वाने अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत.
– खासदारांना विलीनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो; मात्र विलीनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नसतो.
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली नाही.
– त्यामुळे सहा खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काही खासदारांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी ‘ऑपरेशन टायगर 3’ संदर्भात मोठे विधान केले आहे.






