फोटो - सोशल मीडिया
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे आपल्या आक्रमक पद्धतीच्या कामांसाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या पक्षप्रवेशामुळे वसंत मोरे यांची राज्यभर चर्चा झाली होती. वसंत मोरे हे त्यांच्या धडक हातोडा कारवाईसाठी ओळखले जातात. अनधिकृत बांधकामांवर त्यांचा हा हातोडा नेहमी चालताना दिसतो. आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी कात्रजमध्ये हातोडा घेत एका गाईच्या गोठ्यावर हातोडा चालवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कात्रज भागामध्ये बेकायदेशीर कामांवर हातोडा चालण्यासाठी वसंत मोरे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कात्रजमधील एका गाईची हत्या करण्यात आली. यावरुन वसंत मोरे यांनी संताप व्यक्त करत हातोडा कारवाई केली आहे. कात्रज भागामध्ये गो हत्येचा गंभीर प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनिधिकृत बांधकाम तोडले आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
गोवंश हत्या आणि गोहत्या याच्या विरोधात आमचा हातोडा चालणारच… pic.twitter.com/Hw8eEjLkja
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 21, 2024
कात्रजमधील मांगडेवाडी परिसरातील एका गोठ्यात शनिवारी गाईची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ठाकरेसेनेचे नेचे वसंत मोरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला. तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घेत पोलिसांनी सखोल आणि कठोर कारवाई करावी. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. सोशल मीडिया पोस्टवर वसंत मोरे म्हणाले की, गोठ्याचे बांधकाम अवैध आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा, असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरुन सांगितले. हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे. त्याचे हे प्रकार वाढत आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरु आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाई तो येथे आणून त्याची हत्या करतो. माझ्या परिसरात असे विषय चालू देणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास काय होईल? ते मी आता सांगू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीच्या मागे कोण, कोण आहेत? त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.