Railway News : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचा सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
घरातील किरकोळ वादातून काही मुले घर सोडून निघून जातात. रागारागात ही मुले रेल्वेने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. राग ओसरल्यावर परत जाण्याचा मार्ग त्यांच्या लक्षात येत नाही. अशा वेळी चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत आल्यावर मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होते. यामुळे आरपीएफकडून हरविलेल्या,पळून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबविली जाते.
मुलांचे समुपदेशन करून त्यांना पालकांकडे सोपविले जाते. गेल्या वर्षात मोहिमेअंतर्गत भरकटलेल्या,मानवी तस्करीला बळी पडणाऱ्या ४१२ मुलांची सुखरूप सुटका केली. त्यात ३५५ मुले आणि ५७ मुलींचा समावेश आहे.
आरपीएफ जवान या मुलांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांचे समुपदेशन करून पालकांकडे सोपवितात. त्यामुळे दर महिन्याला ३५ ते ४० हून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे काम हे आरपीएफ जवान व स्वयंसेवी संस्था करते.
पुणे विभागाचे, जनसंपर्क अधिकारी हेमंतरुमार बेहेरा यांच्या मते, अनेक वेळा घरात होणाऱ्या वादामुळे मुले पळून येतात. परंतु शहरात आल्यावर त्यांची दिशाभूल होते. अशी मुले राहण्यासाठी रेल्वे स्थानकाचा आधार घेतात. अशा मुलांचा शोध आरपीएफकडून घेतला जातो. आतापर्यंत पुणे विभागातून एका वर्षात ४१२ मुलांची सुटका केली आहे.
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांशी थेट रेल्वे जोडणीची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. पुण्यातून तीर्थक्षेत्र वाराणसीला जाण्यासाठी रेल्वे गाड्यांची कमतरता होती. आता दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.






