अलिबागमध्ये शिवसेनेचा संताप उसळला (फोटो- सोशल मीडिया)
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जोरदार संताप
आंदोलनात दानवे यांच्या पुतळ्याला चपला घालत मारहाण
पुतळा पेटवून जाहीर करण्यात आला निषेध
अलिबाग: अंबादास दानवे यांनी अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याविरोधात तसेच चुकीचे व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला. या निषेध आंदोलनात दानवे (Ambadas Danve) यांच्या पुतळ्याला चपला घालत मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पुतळा पेटवून जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
अलिबाग (Alibaug) तालुक्यातील महाराज चौकात शेकडो शिवसैनिक जमा झाले. “अंबादास दानवे मुर्दाबाद”, “महेंद्र शेठ दळवी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याविषयी खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
निषेधकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. या कृतीमुळे चौकात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
निदर्शनावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, कामगार नेते दीपक रानवडे, मानसीताई दळवी, संजीवनी नाईक, उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष तनुजा मोरे, भगीरथ पाटील, स्वप्निल पाटील, तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “आमदार महेंद्र दळवी यांचा अपमान करणाऱ्याला शिवसेना कधीच सोडणार नाही. दानवेंनी केलेल्या खोट्या आरोपांवर कायदेशीर कारवाई व्हावी.” शिवसैनिकांनी प्रशासन आणि सरकारला इशारा देत सांगितले की, अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वा चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.






