कॉंग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळे संजय राऊत आक्रमक झाले (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई : मुंबईमध्ये मराठी माणूस सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित व्हावा अशी घटना घडली आहे. कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये परप्रांतीय माणसांनी मराठी माणसं घाण आहेत म्हणत भांडण केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कल्याणमधील मराठी माणसांवरील हल्ल्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कल्याणमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्यावर भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी मराठी माणसाची फळी फोडली. मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि आजूबाजूचा परिसर अदानी, लोढा गुंड्यांच्या इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी मोदी, शहा, फडणवीस मराठी माणसाला कमजोर करत आहेत. कालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हे हल्ले वाढत चालले आहेत. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे हे कट सुरू आहेत. ज्यांच्या हातामध्ये हे शिवसेनेचे चिन्ह मोदी, शहा यांनी दिले ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “त्यांना कल्याणमधील घटनेची वेदना कळते आहे का? एकनाथ शिंदे नामर्द आहेत ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेबांची संघटना फोडायला मदत केली. त्यांनी मराठी माणसाचं नकोसं केलं. एकनाथ शिंदे भाजपची भूमिका पुढे नेत आहेत. मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे. या सर्वांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून घेण्याची. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोललं जात आहे. हल्ले सुरू आहेत हे राष्ट्रीय कारस्थान आहे. मराठी माणसाला कायमचा तडीपार करायचं आहे. कालच्या मराठी माणसांवरील हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. लाज वाटली पाहिजे या सर्वांना,” अशा कडक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
भाजप खासदारांना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे कॉंग्रेस कार्यालय देखील भाजप समर्थकांकडून फोडण्यात आले. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात देशाची गृहमंत्री अमित शहा अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठविला तर, राजकीय पक्षाच्या संघटनेवरती हल्ले केले जातात. ही सत्तेची मस्ती आहे. इतिहासात अनेक दाखले आहेत. हुकूमशाही मस्तवाल लोक नष्ट झालेली आहेत. आम्ही संविधान वाचविण्यासाठी काम करतोय. आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे शंभर बाप खाली उतरावे लागतील. हिंमत असेल तर या अंगावर. ही त्यांच्या अंताची सुरुवात आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संसदेच्या पायऱ्यांवर झालेल्या या धक्काबुक्कीमुळे देशाचे राजकारण तापले आहे. भाजप खासदारांना राहुल गांधी यांच्या धक्क्यामुळे दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी हे जखमी झाले आहेत. याविरोधात भाजपने पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, मी काल राहुल गांधी यांच्यासोबत होतो. आम्ही त्यानंतर पार्लमेंटला गेलो. राहुल गांधी हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. सारंगी यांचा बॅकग्राऊंड पहिला पाहून घ्या, त्यांना ड्रामा थिएटरचा पुरस्कार मिळाला पाहिजे भाजप ही नाट्य शाळा आहे. मराठीत म्हणत आहे ही नटरंगी नार आहे,” असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.