खासदार संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक टीका केली. त्यांच्या राजकारणावर आणि बंडखोरीवर केलेल्या या टीकेवरुन कुणाल कामरा याची देशभर चर्चा झाली. या कवितेमुळे शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले. तसेच त्यांनी कामराचा स्टुडिओ फोडून टाकला. तसेच पालिकेने देखील स्टुडिओ असलेल्या हॉटेलवर बुलडोझर कारवाई केली. यामुळे हे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. कुणाल कामराच्या बाजूने ठाकरे गटाने भक्कम भूमिका घेतली आहे. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. तसेच बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांचा लोकांना मातोश्रीबाहेर चाबकाने फोडले असते असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यमांनी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे जीवंत असताना त्यांनी पत्रक काढून मनसेने त्यांचा फोटो वापरू नये असे सांगितले होते. आता मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश हा राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेता येत नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावाच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधकार ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उद्धवराज एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरुन एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंची लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चाबकाने फोडलं असतं. त्यांची लोक म्हणतात की कुणाल कामराला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे. ही सगळी सत्तेची मस्ती आहे. या देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणार वक्तव्य केलं असेल तर त्यासाठी कायदा आणि कोर्ट आहे, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, आम्ही कोर्टात जातो. तर आमच्यावर मानहानी करणारी वक्तव्य करण्यात आली तर आम्ही न्यायालयात जातो. आता जर कोणी मंत्री थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर या महाराष्ट्रात तालीबानी राज्य सुरु आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता मात्र इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देत आहात. जर तसं असेल तर गद्दारांना कोणती शिक्षा देतात ते माहिती आहे का? हे तुम्ही अफगानीस्तान आणि इरानमध्ये जाऊन बघा. जो गद्दार असतो त्याला भर चौकामध्ये उघड करुन भर चौकामध्ये त्याच्या पार्श्वभागावर 100 फटके मारले जातात. कुणाल कामराला इस्लामिक राष्ट्राप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांना देण्यात येणारी ही शिक्षा तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.