एकनाथ शिंदे सरकारात्मक नसतील तर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानुसार, आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यातच महायुतीचा भाग असलेला भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचीही अंतर्गत चर्चा आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होत नसतील तर त्यांना विरोधी पक्षनेते करून मोठी खेळी खेळण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकार चालवणे सोपे होईल, असेही म्हटले जात आहे.
हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी
नव्या सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. यासाठी भाजप-महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये सरकार स्थापनेसाठी प्रचंड तणाव आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आडमुठी भूमिका सत्तास्थापनेत अडसर ठरत आहे.
साताऱ्यातील दरेतून ठाण्यात
एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या गावातून ठाण्यात परतले. यानंतर महायुतीचे सरकार स्थापनेबाबत सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.
एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला
दरम्यान, सोमवारी सकाळी अचानक त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या. यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या संघर्षाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र, शिंदे यांची प्रकृती ठीक नसून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, महायुतीचा भाग असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीची यामध्ये नवी भूमिका पाहायला मिळत आहे. पडद्यामागे काही नवी राजकीय खिचडी शिजली जात आहे का, अशीही चर्चा आहे.
शिंदे यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची खेळी
महायुतीचा भाग असलेला भाजप मोठा ‘खेला’ करण्याच्या तयारीत असल्याचीही अंतर्गत चर्चा आहे. शिंदे सरकारमध्ये सहभागी होत नसतील तर त्यांना विरोधी पक्षनेते करून मोठी खेळी खेळण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकार चालवणे सोपे होईल.
काय सांगतो नियम?
नियमांनुसार, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे. पण उद्धव यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तेवढे आमदार नाहीत. अशा स्थितीत 57 आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदे सहज विरोधी पक्षनेते होऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील सहकारी पक्षांच्या सरकारसमोर विरोधी पक्षनेते बनण्याची कल्पना पचनी पडणे कठीण आहे. सोबतच, यामुळे सर्वसामान्यांमध्येही चुकीचा संदेश जाईल.
आधी मुख्यमंत्रिपदावर दावा अन् नंतर मात्र माघार…
बहुमत मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मात्र, भाजपने तो फेटाळून लावल्यानंतर जड अंतःकरणाने शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदावर जो काही निर्णय घेतील, तो त्यांना मान्य असेल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांपासून दुरावले.