महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर शंका घेतल्यामुळे शंभूराज देसाई यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येऊन तीन महिने झाले आहेत. महायुतीने पूर्ण एकतर्फी बहुमताने सरकार देखील स्थापन केले आहे. मात्र यावरुन अजूनही राजकारण सुरु आहे. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत व खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. यावर आता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शंभूराज देसाई यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. विरोधकांकडून महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला जात असताना शंभूराज देसाई म्हणाले की, “जो सज्ञान आहे जो पात्र आहे त्याला मतदान करायला कसं रोखायचं. त्यांना शंका असेल तर निवडणूक आयोगाकडे जावं. ज्या मतदान करणाऱ्या लोकांवर आक्षेप आहे त्यांची नावे निवडणूक आयोग चौकशी करेल. याची निवडणूक आयोग दखल घेईल. मतदान करणाऱ्या लोकांवर जर कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं,” असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्याचा लवकरच अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. याबाबत माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “राज्याचा अर्थसंकल्प येणारं आहे त्यापूर्वी ही बैठक झाली. वित्तमंत्री आढावा घेत असतात, सातारा जिल्ह्याचा आढावा आम्हीं सादर केला आहे. ७१५ कोटी रूपयांचा प्रस्तावित आराखडा सादर केला आहे. सगळे प्रकल्प आम्ही अजित पवार यांना दाखवले आहेत. अजित पवार यांनी समाधान व्यक्त केल आहे. यापुढे तिन्ही नेते एकत्रित बसतील आणि निधी कसा द्यायचा हे ठरवतील. राज्याची आर्थिक घडी ठीक आहे. अनेक योजना आपण आणल्या आहेत लोकांसाठी योजना राबवल्या थोडासा वित्तीय बोजा वाढला असला तरी महाराष्ट्राचे ते पेलवण्याची क्षमता आहे. आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत की इन्कम सोर्स कसे वाढवता येतील,” असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
मराठीमधील अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत शंभूराज देसाई म्हणाले की,” हे वक्तव्य निंदनीय आहे आम्ही जाहीर निषेध करतो. गृह विभागाने राहुल सोलापूरकर यांच्या व्हिडिओची तपासणी करावी कडक भूमिका घ्या कडक धोरण राबवावंराहूल सोलापूरकरने नुसती दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक रगडत माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी राहूल सोलापूरकर यांनी केली आहे.