अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारती माफीनामा (फोटो - सोशल मीडिया)
Anjali Bharti Apology : मुंबई : कवाली गायिका अंजली भारती या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. अंजली भारती यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. कवालीकार अंजली भारती यांनी भंडाऱ्याच्या फुलमोगरायेथे 14 जानेवारीला झालेल्या भीम मेळावा दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे भाजप नेते (BJP Politics) आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अगदी त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली. यानंतर अंजली भारती यांना उपरती आली असून त्यांनी व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका अंजली भारती हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे वक्तव्य केले होते. याची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतली होती आणि कारवाईचा बडगा उगारला. संपूर्ण राज्यातून टीका झाल्यानंतर अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांची माफी मागितली आहे.
हे देखील वाचा : गायिका अंजली भारती जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
व्हिडिओ शेअर करताना अंजली भारती म्हणाल्या की, माझा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भाजपचे रोजंदारीवर ठेवलेले कार्यकर्ते आणि स्वयंघोषित महिला नेत्या टीका टिप्पणी करत होते. मात्र या व्हिडिओची पार्श्वभूमीवर अशी होती की त्या कार्यक्रमामध्ये मी प्रबोधन करत असताना आणि सर्व महिलांची बाजू मांडत असताना हे वक्तव्य केले होतं. प्रत्येक जातीच्या महिलांवर जे अत्याचार सुरु आहेत, बलात्कार होत आहेत त्याविषयी मी बोलत होते. दोन वर्षांची, पाच वर्षांची मुली सुद्धा यामधून सुटत नाहीत. याबाबत मला गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला ही परिस्थिती सांगायची होती. त्यांचं लक्ष मला वेधायचं होतं, अशी भूमिका अंजली भारती यांनी घेतली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की,”महिलांसाठी आता जे काही कायदे आहेत ते काही परिपूर्ण नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कासाठी ते अपुरे पडत आहे. यावर गृहमंत्र्यांनी काही तरी असा ठोस कायदा करावा किंवा फाशीची तरतूद करावी. लहान मुलींवरील अत्याचार थांबले पाहिजेय तुमच्या हातामध्ये कायदे आहेत. तुमच्या हातामध्ये निर्णय घेता येत असूनही तुम्ही का यामध्ये लक्ष का घालत नाही. कायद्यामध्ये का तरतूद करत नाही. या नाबालक मुलींवर अत्याचार होत असताना तुम्हाला डोळ्यांनी बघायचं आहे का? तुम्ही केव्हा कठोर कायदे करणार?” असे प्रश्न अंजली भारती यांनी उपस्थित केले आहेत.
हे देखील वाचा : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन
यापुढे अंजली भारती म्हणाल्या की, “समाजातील लहान लहान मुलींवर, स्त्रीयांवर अत्याचार सुरु आहेत. असं या मुलींवर बायकांवर अत्याचार होता होता तुमच्या पत्नीवर सुद्धा बलात्कार होऊ शकते. तेव्हा तुम्ही सक्त कायदा करणार आहात का? बोलण्याच्या ओघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर तुम्ही बलात्कार करा असं माझ्या तोंडातून चुकून हा शब्द गेला आहे. आणि तो योग्य नाही याची मला जाणीव झाली आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची गायिका असल्यामुळे मी महिलांचा सन्मान करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर आहेत. दुर्देवाने माझ्या बोलण्याची पोटतिडक बघून न घेता माझ्यावर टीका केली. चाकणकर, चित्रा वाघ, नवनीत राणा यांनी माझ्या बोलण्याचा हेतू लक्षात न घेता माझ्यावर तुटून पडल्या,” असे देखील अंजली भारती म्हणाल्या आहेत.
मी दलित समाजातील गायिका आहे म्हणून…
पुढे त्या म्हणाल्या की, “खरंच जर तुम्हाला महिलांबद्दल काही वाटत असेल तर लातूरचं प्रकरण, मालेगावचं प्रकरण, महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होत आहे. राज्यातील लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहे. तिथे तुमचा आक्रमकपणा दिसून का येत नाही? तिथे तुमची तळमळ दिसत नाही. जिथे अत्याचार होतो तिथे तुम्हाला काही वाटत नाही. पण जिथे अत्याचार फक्त करा म्हटलं तर तुम्हाला एवढा त्रास होतो आहे. याचा अर्थ एकच आहे की मी दलित समाजातील गायिका आहे म्हणून मला उद्धवस्त करण्यासाठी, माझा आवाज दाबण्यासाठी आणि माझ्या भावना न समजून घेता यांनी मला टार्गेट करण्याचे काम केलं आहे. भाजपच्या किती कार्यकर्त्यांनी मला फोन करुन धमक्या दिल्या आहेत. तु जे बोलली ते तुझ्यासोबत भरचौकामध्ये करु. तुझा आम्ही मर्डर करु अशा धमक्या मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत,’ असा आरोप अंजली भारती यांनी केला आहे.






