ई-महाभूमीच्या माध्यमातून शासन झाले 'मालामाल'; अभिलेखातून 76.80 कोटींचा महसूल प्राप्त (File Photo : Mantralay)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊन निकालही लागला आहे. या निकालाला आज एक आठवडा पूर्ण होत आहे. तरीही राज्यात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप भाजपाकडून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यातच खातेवाटपावरून महायुतीत मतभेद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील घोषणा थांबल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने नकार दिल्यामुळे शिवसेना नगरविकाससोबत गृह खात्यासाठीही आग्रही आहेत. त्यावरून पेच निर्माण झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे आपल्या गावी गेल्यामुळे आता सरकार स्थापण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत डेडलॉक निर्माण झाला आहे.
शनिवार, रविवार अमावस्या असल्यामुळे नवे सरकार २ तारखेनंतर मार्गशीर्ष महिन्यात अस्तित्वात येईल, असे एकंदरीत चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीचे तीन महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गुरुवारी रात्री बैठक पार पडली.
एकनाथ शिंदे नाराज
एकनाथ शिंदे मुंबईतील बैठकीतून अचानक निघून गेल्याने नवीन सरकार स्थापनेवरून ते काहीसे नाराज असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे साताऱ्यातील त्यांच्या गावी गेले आहेत. आता शिंदे परतल्यानंतर मुंबईत ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शुक्रवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी सरकार स्थापनेबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचा दावा केला.
शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद नको ?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांबाबत सर्व काही निश्चित झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काही मंत्रिपदांबाबतची चर्चा रखडल्याचे दिसत आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला कायम राहणार आहे. पण, स्वतः एकनाथ शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यात रस नाही. शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, त्यांची उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे योग्य होणार नाही.
गृह आणि अर्थ मंत्रालयावर चर्चा अडकली
शिंदे सरकारमध्ये गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. मुख्यमंत्रिपद सोडायचे झाल्यास शिवसेनेने गृह आणि अर्थ मंत्रालयावर दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजपला गृह आणि अजित पवार यांना अर्थमंत्रालय सोडायचे नाही. एकनाथ सरकारमध्ये गृहखाते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते, असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. त्यानुसार शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना गृहमंत्रालय मिळावे.
हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर