Sunil Shelke News: रोहित पवारांनी 'भविष्यवाणीचा' धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल
आमदार सुनील शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांवर टीका करत म्हटले की, “अजित दादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. इतकं खोटं सातत्याने बोललं जात आहे की महाराष्ट्रातील जनतेलाही ते खरं वाटू लागलं आहे.”
तसेच, काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत रोहित पवारांनी भविष्यवाणीचा नवीन धंदाच सुरू केला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. सुनील तटकरे , प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत,” असे शेळके यांनी स्पष्ट केले.
“आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लागत असताना आम्ही दुसरा पर्याय का शोधू?” असा सवालही त्यांनी उपस्थित करत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये यासाठीच ते प्रयत्न करत आहेत. “बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा यासाठी रोहित पवारांनी हट्ट धरला होता. तसेच २०२९ मध्ये ते स्वतः काँग्रेसकडून बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत,” असा दावा त्यांनी केला.
“जर रोहित पवारांनी नैतिकतेबद्दल बोलायचं असेल, तर त्यांनी आधी जाहीर करावं की ते भविष्यात सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीही उभे राहणार नाहीत,” असे आव्हानही शेळके यांनी दिले.
तसेच, “पवार साहेब आणि अजित दादांसोबत ३५ ते ४० वर्षे अडचणीच्या काळात उभे राहिलेल्या नेत्यांवर आरोप करून तुम्हाला काय साध्य करायचे आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी रोहित पवारांवर पक्षात संभ्रम निर्माण करण्याचा आरोप केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात आणखी मजबुतीने उभा राहील आणि २०२९ च्या निवडणुकीत २०२४ पेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स देईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.






