स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत 'संदीप' नावाचे 'आशिर्वाद' कोणाचे? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ
विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या धडाक्यानंतर स्वारगेट पोलिसांनीही कारवाईचा मलिमा लावण्यासाठी एक कारवाई केली. दरम्यान या बेकायदेशीर धंद्यांना स्थानिक पोलिसांचे एका ‘संदीप’च्या आर्शिवादाने हे सुरू असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे, एका तडीपाराला पकडल्यानंतर याप्रकरणात देखील मोठा हस्तक्षेप या ‘संधी’प पर्वाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्हे शाखेने स्वारगेट बस स्थानकाजवळील कॅनॉल शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईत नदिम शेख (वय ३८, रा. गुलटेकडी) आणि बाळासाहेब दगडू अवचटे (वय ६२, रा. मंगळवेढा, सध्या रा. डांगोचौक) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या आणि साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरा प्रकारात सातारा रोडवरील एसटी कॉलनीजवळील सार्वजनिक शौचालयाच्या खोलीतून विदेशी मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला. येथून ४७ हजार ४६५ रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी रजत दीपक गायकवाड (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज) याला ताब्यात घेतले आहे. दोन्ही कारवाया मंगळवारी दुपारी झाल्या.
स्वारगेट सारख्या परिसरात सातत्याने अवैध धंदे सुरू असल्याचे समोर येत आहे. कधी गुटखा, तर कधी अवैध धंदे आणि हुक्का पार्लरचे प्रकार यापुर्वी समोर आले आहेत. गुन्हे शाखेकडून व स्थानिक पोलिसांकडून या कारवाया सुरू आहेत. पण, सूत्रांच्या माहितीनुसार, आयुक्तांच्या कडक भूमिकेत देखील स्थानिक पोलिस ठाण्यातील एका ‘संधी’प पर्वाच्या आर्शिवादाने सुरू असल्याचे समजते. वरिष्ठांकडून सातत्याने सूचना देण्यात येत असताना या अवैध धंद्यांची माहिती का मिळत नाही, की मुद्दाम डोळे झाक केले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे.






