'आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?'; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याच्या चर्चांनी खळबळ
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, या संपूर्ण प्रकारावरून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आपली नावे नसल्याबद्दल विचारणा केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत पक्षातील भूमिका आणि निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी ‘ही यादी कोणी बनवली,’ आपल्याला न विचारता यादी बनविली, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, ‘ पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कष्ट केले, पण आमचीच नावे यादीत नाहीत, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांच्यासमोर नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तटकरे, भुजबळांच्या नाराजीनंतर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक झाली, अशा आशयाचे ट्विटही केले. पण त्यानंतरही दोन्ही नेत्यांची नाराजी कायम आहे, असे सुत्रांकडून सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील या नाराजी नाट्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपमधून लढणार असून, याबाबत त्यांनी निर्णयदेखील घेतल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच, यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचेही काही लोक सामील आहे. सर्वजण मिळून 40 जण आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.






