मुख्यमंत्र्यांच्या घटस्फोट प्रकरणाला नवे वळण! महिला न्यायालयाने सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली
Tamil Nadu CM Vijay Divorce Case: तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि त्यांच्या विभक्त पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी दाखल केलेल्या घटस्फोट याचिकेवरील सुनावणी, जी सोमवार, १५ जून रोजी होणार होती, ती आता ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी सोमवारी सकाळी १०:३० वाजता चेंगलपट्टू महिला न्यायालयात होणार होती, परंतु ती तात्काळ पुढे ढकलण्यात आली.
आज (15 जून) सकाळी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात संगीता सोरनालिंगम यांनी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत संगिता यांनी विजय यांच्यावर मानसिक छळाचे आरोप करत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता.
याचिकेमध्ये त्यांनी विवाह संपुष्टात आणण्याची मागणी करण्यासोबतच विजय यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीनुसार पोटगी, तसेच नीलंकराई येथील कौटुंबिक निवासस्थानी राहण्याचा अधिकार मागितला आहे.
संगीता यांनी विजय यांच्यावर मानसिक छळाचा आरोपही करत एका चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. आपल्या याचिकेत, संगीता यांनी घटस्फोटाचा आदेश, विजयच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीनुसार पोटगी आणि कुटुंबाच्या नीलंकराई येथील घरात राहण्याचा हक्क मागितला होता.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान विजय आणि संगीता हे दोघेही न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला, विजय आणि संगिता हे प्रसिद्ध व्यक्ती असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास त्यांच्या सुरक्षा आणि व्यवस्थापनासंदर्भातील अडचणी निर्माण होऊ शकतात. असा दावा केला होा, तसेच त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांना १५ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता प्रकरण पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, विजय आणि संगीता यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही काही दिवसांपासून सुरू होती. विशेषतः विजय यांच्या आई शोभा थलपती या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे बोलले जात होते. मधल्या काळात घटस्फोटाची याचिका दाखल झाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या वृत्तांबाबत विजय किंवा संगीता यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुख्यमंत्री विजय हे राज्याच्या राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व असल्याने या प्रकरणाकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी सुनावणीत न्यायालयीन प्रक्रियेतून या दाम्पत्याच्या नात्याबाबत काही स्पष्टता मिळते का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. समर्थक, राजकीय निरीक्षक आणि माध्यमांचे लक्ष आता ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.






