शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षक भरती घोटाळा; अनिल देशमुखांनी केली पोलखोल
नागपूर : शिक्षण मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच शिक्षक भरती घोटाळा उघड झाल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. देशमुख म्हणाले की, मालेगाव (जि. नाशिक) येथे नवीन शिक्षक तुकडी मान्यता प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाली आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मतदारसंघात हा प्रकार उघडकीस आला असून, सरकारच्या जीआरनुसार प्रक्रिया असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती आणि तुकडी मान्यता देण्यात आली.
एकाच व्यक्तीची दोन शाळांमध्ये नियुक्ती झाल्याचे प्रकरणही समोर आले असून, १०० पेक्षा अधिक बोगस शिक्षकांची भरती झाल्याचा आरोप त्यांनी केला. देशमुख यांनी सांगितले की, नागपूरमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, मात्र केवळ स्थानिक चौकशी पुरेशी नाही. याची राज्यस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.
Sikkim Army Camp Landslide: सिक्कीमध्ये लष्करी छावणीत भुस्खलन; ३ जणांचा मृत्यू ९ जवान बेपत्ता
जर सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशाराही देशमुख यांनी दिला. “हे प्रकरण व्यापम घोटाळ्यापेक्षाही गंभीर आहे,” असा दावा त्यांनी केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडले असून त्याची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, साखर संघाच्या बैठकीत दोघांची भेट झाली होती. अशा भेटी संस्थात्मक स्वरूपाच्या असतात, त्यावरून एकत्र येण्याची शक्यता गृहित धरू नये. तसेच, अंगणवाडी सेविकांना शिक्षिका बनवण्याचा निर्णय हा उपक्रम स्वागतार्ह असून, पात्रता असलेल्या सेविकांना प्रशिक्षण देऊन संधी मिळावी, असे मत त्यांनी मांडले.
माझी लाडकी योजना हा निवडणुकीपुरती घोषणा होती. शासकीय महिलांना लाभ मिळणार नाही, असे कोणतेही स्पष्ट वक्तव्य त्यावेळी करण्यात आले नव्हते. जर काहींना नियमबाह्य मंजुरी दिली असेल, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच, निवडणूक आयोगाने तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अनिल देशमुख म्हणाले की, “जनतेला आणि उमेदवारांना याची वाट पाहावी लागत आहे. स्वच्छ पाणी, साफसफाई अशा मूलभूत समस्या प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणुकांबाबत आदेश दिले आहेत.”
उद्धव व आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवरून त्यांनी सत्ताधारी महायुतीवरची पलटवाक केला. “फक्त आरोप करून चालत नाही, ते कागदपत्रांच्या आधारे आरोप करावे लागतात. आम्ही कागदपत्रे सादर करतो, तरीही आमच्यावरच आरोप होतात,” असा पलटवारही अनिल देशमुख यांनी केला. राज्य सरकारने नुकसानीची मदत ३ हेक्टरवरून २ हेक्टरवर आणल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कर्जमाफीचे आश्वासन देणारे आता शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आदेश देत आहेत. “फडणवीस म्हणत होते सातबारा कोरा करू, आता अजित पवार म्हणतात कर्ज भरा”, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.