आम आदमी पक्षाला कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची साथ; निवडणुकीचे चित्र बदलणार? (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगूल वाजले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष समीकरणं जुळवून युती-आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या नाराज कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत महानगरपालिका निवडणुकीत ‘कार्यकर्ता पॅटर्न’ राबवणार असल्याची घोषणा केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते की, येणाऱ्या निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवू आणि सर्वांना न्याय देऊ. मात्र, महापालिका निवडणुकीत असं झालं नाही. आमच्यावर अन्याय झाला. फक्त आम आदमी पार्टीवर अन्याय झाला नाही तर सर्व घटक पक्षांवरही अन्याय झाला. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना तुझ्याकडं ५० लाख, १ कोटी रुपये आहेत का? निवडणूक लढवण्याची औकात आहे का? असे प्रश्न विचारले. त्यामुळे नाराज झालेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इंडिया आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीसोबत महानगरपालिका निवडणुकीत ‘कार्यकर्ता पॅटर्न’ राबवणार आहे, अशी घोषणा आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई आणि वंचितचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता खासदार आणि आमदारांच्या मुलांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. ज्यांच्या घरात महापौरपद होतं. त्याच्या घरात तिकीट देण्यासाठी पदाधिकारी हट्ट करून बसलेत. मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनं करायचं काय? राब-राब राबलेल्या कार्यकर्त्यांनी तुमची धुनी धुवायची की भांडी घासायची? म्हणून आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीशी संपर्क केला. सुशिक्षित आणि कष्टकऱ्यांचं प्रतीक एकत्र आल्यानं आमची युती झाली आहे.
कार्यकर्ताच करू शकतो कोल्हापूरचा विकास
कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर कार्यकर्ताच करू शकतो. आतापर्यंत कार्यकर्त्यांने तळमळीनं काम केलं. घराणेशाही आणि टक्केवारीच्या विरोधात आम आदमी पार्टीची आणि वंचितची युती करत आहे. आम्ही घटक पक्षांना न्याय देणार आणि प्रस्थापितांना धूळ चारणार असून कोल्हापुरातील टक्केवारीची कीड संपवणार, असं वंचितचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी देताना अटी घातल्या
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मतांसाठी आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वापर केला. आता उमेदवारी देताना अटी घातल्या आहेत. यामुळं नाराज झालेल्या आम आदमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीशी काडीमोड घेत आपल्या भूमिका जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेस आघाडीला गुरुवार सायंकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, अजूनही निर्णय न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे,” असं आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे






