छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोप करणाऱ्या महिलेने आपले आरोप मागे घेतले असून, हे माझे वैयक्तिक प्रकरण आहे. यावर कुणीही राजकारण करू नये, मी इथेच या प्रकरणाला फुलस्टॉप देते, असं म्हटलं आहे. “हे आपले घरगुती प्रकरण असून, विरोधी पक्षांनी यावर राजकारण करू नये.”असंही नमुद केलं आहे.
आरोप मागे घेण्याच्या निर्णयामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे. मात्र, आरोप मागे घेण्यासाठी महिलेवर राजकीय दबाव आणल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होऊ लागल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे सेनेवर टीकाही करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणावर राजकीय वर्तुळांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
काय म्हटलं आहे महिलेने?
सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या यांच्या मुलावर केलेल्या आरोपांबाबत महिलेने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली आहे, “मी आरोप मागे घेत आहे आणि माझ्यावर कोणताही दबाव नाही. संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेत आहे. हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून, या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुलस्टॉप देते. जर कोणी माझ्या नावाने राजकारण करेल तर मी कायदेशीर कारवाई करेन.” तिने अजून म्हटले की, “मी शिरसाट साहेबांचा सन्मान करते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही आणि फोनही केला नाही.” या विधानानंतर प्रकरणाला शांतता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र राजकीय वर्तुळांतून या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप ताजे असतानाच, मुंबईतून आणखी एका धक्कादायक प्रकरणाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत.
जान्हवी सिद्धांत शिरसाट नावाच्या महिलेने सिद्धांत यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली असून, मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडा या प्रकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, २०१८ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून जान्हवी आणि सिद्धांत यांची ओळख झाली. मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
महिलेने आरोप केला आहे की, सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन तिला भावनिकरित्या ब्लॅकमेल केले आणि लग्नासाठी दबाव टाकला. त्यांच्या वर्तनामुळे तिने लग्नासाठी होकार दिला. १४ जानेवारी २०२२ रोजी दोघांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला असल्याचा दावा देखील महिलेने केला आहे. तिला गर्भधारणाही झाली होती, परंतु सिद्धांत शिरसाट यांनी जबरदस्तीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप नोटीसीत नमूद करण्यात आला आहे. महिलेने आपल्या तक्रारीसाठी पुरावे देखील असल्याचे सांगितले आहे.