ऐरोलीत नाट्यगृह उभारणीला गती; कलाकारांसाठी सुविधा वाढणार
नवी मुंबई, सावन वैश्य : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून ऐरोली येथे नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाला आता अधिक गती मिळत असून या नाट्यगृहामुळे कलाकारांच्या सुविधेत वाढ होणार आहे.
या नाट्यगृहाच्या उभारणी दरम्यान नवी मुंबईतील अभिनेते तसेच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबईचे प्रभारी सुनील पगार यांनी ऐरोली येथील नाट्यगृहाची पाहणी केली. पाहणी दरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्यावर, त्या नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे सुनील पगार यांनी हा विषय वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारमध्ये मांडला. यावेळी ठाणे लोकसभा माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी नगरसेवक व भाजपा महामंत्री अनंत सुतार, तसेच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभागाच्या संयोजिका अक्षया चितळे यांच्या उपस्थितीत नाट्यगृहासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.
यानंतर सुनील पगार यांनी न.मुं.म.पा अधिकाऱ्यांसोबत ऐरोली नाट्यगृहाची पुन्हा पाहणी करून काही सुधारणा सूचवल्या, ज्या भविष्यात नाट्यप्रयोग करताना कलाकार व निर्मात्यांना तसेच स्थानिक कलाकारांना उपयुक्त ठरणार आहेत.
1. नाट्यगृहातील तालीम सभागृह रंगमंचाखाली न करता दुसऱ्या जागेत हलविणे.
2. मेकअप रूम महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र करणे (2 चेंजिंग रूम निर्माण करणे).
3. रंगपीठाचा आकार वाढवणे.
4. नेपथ्य ने-आण करण्यासाठी असलेली हायड्रोलिक ट्रॉली कमी आकाराची करून बाजूला प्लॅटफॉर्म उभारणे.
5. प्रवेशद्वाराजवळ वाचन कट्टा व कलाकार कट्टा उभारणे.
यावेळी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई प्रभारी सुनील रमेश पगार, विठ्ठल बांगर तसेच नवी मुंबईतील विविध रंगकर्मी उपस्थित होते. नवी मुंबई पालिका जी-वॉर्डचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता जितेंद्र नाईक, कनिष्ठ अभियंता धनेश चव्हाण, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय सिंग पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
“ऐरोली नाट्यगृहाच्या इमारतीचं सध्या सुमारे ४५% काम पूर्ण झालेलं आहे. आता कोणतीही तोडफोड न करता, उपलब्ध जागेतच आपण मांडलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी कशी करता येईल, यावर पालिका अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच आर्किटेक्चरसोबत सविस्तर पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.”, अशी प्रतिक्रिया अभिनेता व भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई प्रभारी सुनील रमेश पगार यांनी दिली.