 
        
        महायुती न झाल्यासही निवडणूक लढवणारच; शिवसेनेच्या 'या' पदाधिकाऱ्याचा निर्धार (फोटो - iStock)
मेढा : जावळी तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले असून, खर्शी-बारामूरे गण सर्वसाधारण प्रवर्गाला जाहीर झाल्याने व पंचायत समितीचे सभापतिपद देखील खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने खर्शीबारामुरे गणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती झाल्यास हा गण शिंदे सेनेला सोडण्यात यावा व महायुती न झाल्यास देखील या गणातून आपण निवडणूक लढणारच असल्याचे शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख समीर गोळे यांनी सांगत खर्शी बारामुरे गणात शड्डू ठोकला आहे.
शिवसेनेने यापूर्वी या गणातून निवडणुका लढवून जिंकल्या देखील आहेत. तर याच गणाने पंचायत समितीचे प्रतिनिधित्व देखील केलं आहे. यामुळे हा हक्काचा गण आपल्या ताब्यात रहावा यासाठी शिवसेना आता सरसावली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख व भोगवली तर्फ कुडाळचे लोकनियुक्त सरपंच समीर गोळे यांना येथून उतरवले जाईल, त्या दृष्टीने तयारी चालू आहे. तर गोळे हे सर्व तयारीनिशी या गणात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत तयारीला देखील लागले आहेत.
शिवसेना नेते अंकुशबाबा कदम, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी खर्शी-बारामूरे गणावर तसेच जावळी तालुक्यावर भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. तर महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्ष ठरवतील. मात्र, शिवसेना हा गण आपल्या पदरात पाडून घेण्यास उत्सुक आहे.
गोळेंच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी
समीर गोळे हे निष्ठावंत शिवसैनिक असून भोगवली तर्फ कुडाळचे लोकनियुक्त सरपंच देखील आहेत. शिवसेनेत काम करताना त्यांनी तरुणांचे भक्कम संघटन शिवसेनेच्या पाठीशी उभे केले आहे. त्यामुळे त्यांना खर्शी बारामुरे गणातील युवकांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : BMC Election : जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘इतक्या’ जागांचा आग्रह…






