 
        
        महायुतीतील जागावाटपावरून रस्सीखेच सुरू; एकनाथ शिंदे मुंबईत 84 जागांसाठी आग्रही? (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने 84 जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून एकमत होणे गरजेचे असल्याने याकडे लक्ष लागले आहे.
2017 च्या निवडणुकीतील कामगिरी पाहता शिवसेनेने ८४, भाजपने ८२, काँग्रेसने ३१, राष्ट्रवादीने ९, मनसेने ७, समाजवादी पक्षाने ६, एमआयएमने २ आणि अपक्षांनी ४ जागा जिंकल्या होत्या. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती एकत्र लढणार असली, तरी जागावाटपावरून तणाव आहे. शिंदे गट सुरुवातीला 100 हून अधिक जागा मागत होता, आता 84 वर ठाम आहे. भाजप मात्र 70-80 जागाच देण्याच्या तयारीत आहे. मुख्य संघर्ष दोन्ही पक्षांतच आहे. शिवसेना-भाजप नेत्यांनी सांगितले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिन्ही पक्षांच्या भूमिका जाणतात. जागावाटपाचा अंतिम निर्णय ते घेतील, त्यावर विश्वास आहे.
हेदेखील वाचा : Eknath Shinde News:निवडणुकीपूर्वी नगर विकास खात्याकडून ७५० कोटींचे मोठे निधी वाटप; शिंदेसेनेसह, भाजप आमदारही खुष
दरम्यान, महायुती समन्वयाने लढेल, असा दावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत महायुतीचा विजय निश्चित असे म्हटले आहे. बीएमसीत २२७ जागा असून, नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लवकरच मतदान होण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवकांना सोबत घेऊन तयारी
शिवसेनेने (शिंदे गट) माजी नगरसेवकांना सोबत घेत तयारी केली आहे. मात्र, उद्धव ठाकरे गट, मनसे यांच्यामुळे निवडणूक आणखीनच रंगतदार बनणार आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिंदे गटाची आग्रही भूमिका आणि भाजपची संघटनशक्ती यांच्यातील तोडगा कसा निघेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






