फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये विजयादशमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस फक्त सत्याच्या विजयाचे प्रतीक नसून आयुध पूजा, शस्त्रांची पूजा देखील आहे. पंचांगानुसार, यंदा विजयादशमी म्हणजे दसरा गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणाला वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते, त्यांचे महत्त्व आणि पूजेचा शुभ जाणून घेऊया.
दसरा म्हणजे विजयादशमी गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाणार आहे. पंचांगानुसार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.9 ते 2.56 या वेळेमध्ये तुम्ही शस्त्र आणि उपकरणांची पूजा करु शकता. याचा अर्थ पूजेसाठी एकूण कालावधी 47 मिनिटांचा राहील.
या दिवशी शस्त्रांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. पूजा करण्याआधी शस्त्रे किंवा उपकरणे स्वच्छ करुन घ्या. लाल वस्त्र पसरवून घ्या आणि त्यावर शस्त्र ठेवा. शस्त्रांवर गंगाजल शिंपडा आणि रोली, कुंकू आणि चंदनाचा तिलक लावा. त्यावर फुले, हार इत्यादी गोष्टी अर्पण करा. त्यानंतर नैवेद्य दाखवा. शेवटी धूप जाळा आणि आरती करुन प्रार्थना करा. ज्यामुळे नेहमी तुमचे रक्षण होईल आणि तुम्हाला प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळेल.
शस्त्र पूजा ज्याला आयुध पूजा असे म्हटले जाते. विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते. दक्षिण भारतात आणि इतर अनेक ठिकाणी, आयुध पूजाला “शास्त्र पूजा” किंवा “सरस्वती पूजा” असेही म्हणतात. परंपरेनुसार, या दिवशी देवी-देवतांच्या पूजेसोबतच शस्त्रे, अवजारे, यंत्रे आणि वाहनांची पूजा केली जाते.
मान्यतेनुसार, भगवान श्री राम यांनी या दिवशी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता. यावेळी देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी वापरलेली शस्त्रे पूजनीय मानली जातात. विजयादशमी ही विजयाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवशी शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी मदत करणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जाते.
आयुध पूजेचे महत्त्व केवळ शस्त्रांपुरते मर्यादित नाही. यावेळी जीवनात यश मिळवून देणारी सर्व कामाची साधने, जसे की विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांची पूजा करतात, व्यापारी त्यांच्या तराजू आणि खातेवहींची पूजा करतात, कलाकार त्यांच्या हत्यारांची पूजा करतात आणि सैनिक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात. आपली साधने ही आपल्या उपजीविकेचे आणि यशाचे साधन आहेत आणि आपण त्यांचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)