फोटो सौजन्य- pinterest
आज बुधवार 30 जुलै रोजी कल्की जयंती आणि श्रावण स्कंद षष्ठी व्रत आहे. यावेळी कल्की जयंतीला 4 शुभ योग तयार होत आहेत. कल्की जयंती आणि स्कंद षष्ठी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठीला आहेत. यावेळी सूर्य देव कर्क राशीत आणि चंद्र कन्या राशीत असेल. कल्की जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार म्हणजे कल्की यांची पूजा केली जाते. तर स्कंद षष्ठीच्या दिवशी कार्तिकेयची पूजा केली जाते.
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल षष्ठी तिथी आज 30 जुलै रोजी सकाळी 12:46 वाजता सुरू झाली आणि त्याची समाप्ती उद्या 31 जुलै रोजी पहाटे 2.41 वाजता होईल. उद्यतिथीनुसार कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीचे व्रत आज पाळले जाणार आहे.
या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.18 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राहील. परंतु अभिजीत मुहूर्त नाही. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2.43 ते 3.37 पर्यंत आहे, तर निशिता मुहूर्त 31 जुलै रोजी मध्यरात्री 12.07 ते 12.49 पर्यंत आहे.
कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धि योग, रवी योग, सिद्ध योग आणि साध्य योग तयार होतील. यावेळी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवि योग सकाळी 5.41 पासून रात्री 9.53 पर्यंत राहील. तर सिद्ध योग 31 जुलै रोजी पहाटे 3.40 पर्यंत राहील. त्यानंतर साध्य योग तयार होईल.
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान विष्णू कल्की अवतारात जन्म घेतला. श्रीमद्भागवत पुराणानुसार, ज्यावेळी गुरु, सूर्य आणि चंद्र पुष्य नक्षत्रात एकत्र प्रवेश करतात त्यावेळी भगवान विष्णू कल्की अवतारात जन्म घेतात, असे म्हटले जाते.
स्कंद षष्ठीचा दिवस भगवान कार्तिकेयेला समर्पित आहे. स्कंद षष्ठीच्या दिवशी उपवास केल्याने संततीच नाही तर आनंद, शांती आणि आजारांपासून सुटका देखील होते, अशी मान्यता आहे. या दिवशी विधिवत पूजा करुन उपवास केल्याने इच्छित लाभ मिळतात.
स्कंद पुराणात उल्लेख केल्यानुसार, महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी साजरी केली जाते. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान कार्तिकेय यांनी तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यानंतर ही तारीख स्कंद षष्ठी म्हणून साजरी केली जाऊ लागली. या विजयाच्या आनंदात देवतांनी स्कंद षष्ठी साजरी केली.
स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे.
देव्हारा स्वच्छ करुन चौरंगावर लाल कापड पसरवा.
त्यानंतर त्यावर कार्तिकेयची मूर्ती स्थापन करा. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा आणि नऊ ग्रहांची पूजा करा.
पूजेदरम्यान कार्तिकेयांना चंपा फुले, दागिने, दिवे, धूप आणि नैवेद्य अर्पण करा. चंपा हे भगवान कार्तिकेयांचे आवडते फूल आहे. स्कंद षष्ठीला कांड षष्ठी किंवा चंपा षष्ठी असेही म्हणतात. भगवान कार्तिकेयची आरती केल्यानंतर आणि तीन वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर ‘ॐ स्कंद शिवाय नम:’ या मंत्रांचा जप करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)