नवरात्री म्हणजे देवीचा जागर असतो. देवीच्या या उत्सवात गरबा खेळणं आजकाल होतंच होतं. पण गरबा म्हणजे फक्त करमणूकीसाठीचा खेळ आहे का ? नक्की गरबा नृत्याचा अर्थ काय किंवा गरबा म्हणजेच काय हे आज जाणून घेऊयात.
शारदीय नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची उपासना केली जाते. या नऊ दिवसात गरबा नृत्याला विशेष असं महत्व दिलं जातं. या नवरात्रीतील नऊ दिवसात जे धान्य पेरलं जातं ते मातीच्या गर्भातून येतं. एकदंरीतच एक जीव जन्माला येणाऱ्याच्या स्त्रीच्या मातृत्वाचा हा सोहळा असतो असं म्हणतात. त्यामुळे या नवरात्रीत एक मातीचा घडा असतो आणि त्याला आजूबाजूला छिद्र असतात. या मातीच्या घड्यामध्ये एक दिवा तेवत ठेवलेला असतो त्याला गुजराती भाषेत गरबा असं म्हणतात. या दिव्याला स्त्रीच्य़ा गर्भाशयाचं प्रतीक मानलं जातं. याची पूजा केली जाते आणि त्या दिव्याभोवती फेर धरुन जे नृत्य केलं जातं त्याला गरबा नृत्य असं म्हणतात, असं गुजरातमधील काही जाणकार मंडळी सांगतात.
हा दिवा अखंडितपणे तेवत ठेवला जातो. या दिव्याला शक्तीचं प्रतीक म्हटलं जातं.या दिव्याला गर्भदिप असं म्हणतात. या दिव्याभोवती गोल फेरा घेतला जातो. असं म्हणतात की, या दिव्याभोवतीचा गोल फेरा म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा आहे. गरबा नृत्य हे गुजरातचं वैशिष्ट्य आहे. गरबा म्हणजे स्त्रीचा गर्भ अशी मान्यता आहे. या नऊ दिवसात मातीतून रोप येतात, स्त्री गर्भात नवा जीव जन्माला येतो, त्या मातृत्वाचा उत्सव म्हणजे नवरात्र होय. या माहितीनुसार काही जुन्या जाणकार मंडळींच्या मते, गरबा नृत्याच्या खरा अर्थ आजकाल हरवत जात असून कोणत्याही गाण्यांवर कसंही नाचलं जातं. मूळ गरबा नृत्याचा अर्थ आज हरवला आहे. याबाबतची माहिती ही प्रणय घागरे या तज्ज्ञ जाणकारांनी इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.