फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबरपासून झाली आहे आणि 21 सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे. आज पितृपक्षाचा नववा दिवस आहे म्हणजे आज नवमी तिथी आणि अविधवा नवमी आहे. पितृपक्ष 16 दिवस चालते. या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते. तसेच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान, श्राद्ध यांसारखे विधी केले जातात. यावेळी मृत व्यक्तीच्या नावाने ब्राह्मणांना अन्न, पाणी आणि कपडे यांचे दान केले जाते. तसेच अजून एका विधीमुळे हे कार्य अपूर्ण मानले जात नाही. ते म्हणजे कावळ्यांना देखील अन्न अर्पण करणे. श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना अन्न का खायला देतात आणि त्यांचा पूर्वजांशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
श्राद्धाच्या वेळी आपण कावळ्यांना अन्न खायला देतो पण त्यामागील नेमके कारण काय आहे माहीत आहे का? धार्मिक शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे कारण असते, त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथांमध्येही कावळ्यांना खायला घालण्याचा उल्लेख आढळतो.
कावळे घरी येणे चांगले मानले जात नाही. दरम्यान, पितृपक्षात लोक कावळ्यांची वाट पाहतात. यामागील श्रद्धा अशी आहे की जर कावळ्याने पितृपक्षात ठेवलेले अन्न खाल्ल्यास पूर्वज संतुष्ट होतात, अशी मान्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. धार्मिक श्रद्धेनुसार, कावळ्यांनी खाल्ले अन्न पूर्वजांना मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांना अन्न देणे शुभ मानले जाते.
इंद्राच्या पुत्राशी कावळ्यांना अन्न देण्याची एक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता. या कथेचा संबंध त्रेतायुगाशी आहे. ज्यावेळी भगवान श्री रामांनी अवतार घेतला जयंतने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायावर टोचले त्यानंतर भगवान श्री रामांनी गवतापासून बनवलेला बाण मारला आणि जयंतचा डोळा आंधळा केला. ज्यावेळी त्याने आपण केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली त्यावेळी रामाने त्याला वरदान दिले की त्याला अर्पण केलेले अन्न पूर्वजांना दिले जाईल. तेव्हापासून श्राद्धात कावळ्यांना अन्न देण्याची परंपरा चालत आली आहे. म्हणून श्राद्धाच्या वेळी प्रथम अन्न कावळ्यांना अर्पण केले जाते.
पितृपक्षामध्ये जर कावळा तुमच्या घरामध्ये वारंवार येऊन आवाज करत असेल तर तो पूर्वजांनी पाठवलेला संकेत मानला जातो.
जर सकाळी लवकर घराच्या बाल्कनी किंवा दाराजवळ कावळ्याचा आरवला ऐकून आला तर ते पाहुणे येण्याचे संकेत असू शकते.
घराच्या उत्तरेकडे कावळा वारंवार आवाज देणे हे लवकरच संपत्ती मिळण्याचे लक्षण मानले जाते.
जर अचानक तुमच्याभोवती खूप कावळे जमू लागले, तर ते भविष्यात तुमच्या जीवनात मोठ्या बदलाचे संकेत देते.
जर तुम्हाला कधी कावळा वाटेतून जाताना त्याच्या चोचीमध्ये भाकरी, मांस किंवा कापडाचा तुकडा धरलेला दिसला, तर तो तुमच्या बहुप्रतिक्षित इच्छेच्या पूर्ततेचे लक्षण मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)