फोटो सौजन्य- pinterest
रामाची कथा बौद्ध साहित्यात आहे. गौतम बुद्धाच्या काळातदेखील राम लोकप्रिय होता. जैन साहित्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेत कैक सुंदर ग्रंथ आले आहेत. मात्र जैन धर्माला अनुसरून या कथेतील राम अहिंसावादी असतो, मग रावणाचा वध लक्ष्मण करतो असा बदल दिसतो. शीख साहित्यात गुरूग्रंथसाहेबमध्ये रामायणाची दोन रूपे आली आहेत – एक रामकथेचे वास्तविक रूप आणि एक रामकथेचे आध्यात्मिक रूप. 16 व्या शतकापासून, मुसलमान लेखकांनी लिहिलेली 40हून अधिक रामायणे अस्तित्वात आहेत. तसेच 17व्या शतकापासून डच, पोर्तुगीज व इतर युरोपीय मिशनरींनी केलेली भाषांतरे आहेत. अगदी अलीकडे फादर कमिल बुल्के या युरोपियन ख्रिस्ती फादरने हिंदीतून रामकथांवर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. याबद्दल ज्येष्ठ लेखिका व रामायण अभ्यासक दीपाली पाटवदकर यांनी आपल्या पुस्तकात बरीच माहिती दिली आहे.
सोळाव्या शतकात अकबराने अब्दुल कादर बदौनीकडून रामायणाचे पहिले फारसी भाषांतर केले. हा ग्रंथ 150हून अधिक चित्रांनी सजवला होता. अकबरानंतर जहांगीरने दोन भाषांतरे केली. यापैकी एक भाषांतर केले होते मुल्ला साद उल्ला याने. या कवीचे वैशिष्ट्य असे की तो काशीला 12 वर्षे राहून संस्कृत भाषा शिकला. नंतर त्याने दास्तां-ए-राम-ओ-सीता या नावाने रामकथा लिहिली. तेव्हापासून जवळजवळ 19व्या शतकापर्यंत रामायणाची अनेक फारसी भाषांतरे केली गेली. भाषांतरकार अरबी, पर्शियन जरी असले तरी बहुतेक सर्व भाषांतरे भारतात केली गेली आहेत. तसेच काही हिंदू कवींनीसुध्दा पर्शियन भाषांतरे केली आहेत.
दशरथाची भार्या कैकयी ही गंधारच्या उत्तरेला असलेल्या केकयची देशाच्या अश्वपती राजाची कन्या. गंधार म्हणजे आताच्या अफगाणिस्तानच्या व पाकिस्तानचा उत्तरेचा भाग. हा प्रांत म्हणजे भरताचे आजोळ. ‘गांधार’ची आठवण आता अफगाणिस्तानातील ‘कंदाहार’ या शहराच्या नावात शिल्लक आहे. भरताची मुले – पुष्कल व तक्ष यांनी गंधार प्रांतात पुष्कलावती आणि तक्षशीला या नगरी वसवल्या, तर रामपुत्र लवने लवपूर नगरी वसवली असे म्हणतात. या नगरींची आताची नावे आहेत – पेशावर, तक्षीला आणि लाहोर आहे. गंधार प्रदेशात रामायणातील अनेक नावे आजही दिसतात.
पाटलीपुत्र येथून येणारा ऊत्तरापथ हा महामार्ग थेट तक्षशीलेला पोहोचत असे. तसेच युरोप, इजिप्त, पर्शिया, रशिया आणि चीन यांना जोडणारा प्राचीन रेशीम मार्ग तक्षशीलेवरून जात असे. इजिप्तची काच, पर्शियाची जाजम/गालिचे, भारतीय मसाले, चिनी रेशीम इत्यादी व्यापाराचा हा राजमार्ग. या महामार्गावरून रामकथासुद्धा मध्य आशियाई देशांत पोहोचली.
तिबेटमधल्या एका रामायणात राम हनुमानाबरोबर सीतेला देण्यासाठी एक पत्र देतो आणि सीता हनुमानाबरोबर रामाला पत्रोत्तर पाठवते, असे रंगवले आहे. तिबेटी रामायणाची काही जुनी हस्तलिखिते ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतात.
तिसऱ्या शतकात बौद्ध जातकातून रामाच्या कथा चीनमध्ये पोहोचल्या होत्या. चीनमधील मोगाओ लेण्यांमध्ये श्रावणबाळाची कथा चितारली गेली. चिनी रामकथेतील पात्रांनी चिनी नावे धारण केली आहेत – लोमो (राम), लोमन (लक्ष्मण), नालोयेन (नारायण), पोलोरो (भरत) इत्यादी! चीनमध्ये हनुमान या सुपर हिरोच्या नवीन कथा लिहिल्या गेल्या. चीनमध्ये हनुमान लोकप्रिय झाला, तरी जपानच्या रामायणात हनुमान नाही! जपानच्या रामायणाचे नाव आहे रामाएन्शो. रामाची कथा यथावकाश मोंगोलियामध्येदेखील पोहोचली. कथेत बारीक बारीक बदल होत, मोंगोलियामध्ये पोहोचलेल्या रामायणात लक्ष्मणाऐवजी भरतच रामाबरोबर वनवासात गेला आहे.
कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण समुद्रमार्गाने भारतातून कंबोडियामध्ये पोहोचला. साधारण इ.स.पूर्व पहिल्या शतकातील ही घटना असावी. याने तेथील नाग राजकन्या ‘सोमा’शी विवाह केला. कौंडिण्यने तिथल्या लोकांना भारतीय भाषा शिकवली, लिपी शिकवली, संस्कृती शिकवली, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था शिकवली. कालांतराने भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व धार्मिक साहित्य या भागात रुजले.
पौराणिक साहित्याबरोबरच रामायण, महाभारत व पुराणे आग्नेय देशांमध्ये पोहोचले. जसे भारतात प्रत्येक भाषेत रामायण लिहिले गेले, तसेच इथे सुद्धा स्थानिक भाषांमध्ये रामायणे लिहिली गेली.
आज मलेशियामध्ये व इंडोनेशियामध्ये नौदलाच्या व तटरक्षक दलाच्या प्रमुखपदासाठी (ऍडमिरलकरिता) ‘लक्ष्मण’ ही पदवी वापरली जाते. इथे विशेष असे, की 17व्या शतकातील इथला सुलतान सिकंदरचे वर्णन ‘रामासारखा थोर राजा’ असे केलेले दिसते. कंबोडियामध्ये ‘रामकेर्ती / रामाकीयन’ या नावाने रामकथा लिहिली गेली. आजही थायलंडचे राजे ‘राम’ हेच नाव धारण करतात. थायलंडचा सध्याचा राजा आहे – राम दहावा.
आग्नेयातील देशांवर रामकथेची विलक्षण पकड आहे. म्यानमारचे रामायण ‘यामायन’ हे म्यानमारचे राष्ट्रीय महाकाव्य मानले जाते, तर थायलंडचे रामायण – रामाकेन हे थायलंडचे राष्ट्रीय महाकाव्य (National Epic) आहे. तर रामाचे शब्द ‘जननीजन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी’ हे नेपाळचे ब्रीदवाक्य आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्रीराम यांची कथा प्राचीन काळात व्यापारमार्ग, धर्मप्रसार आणि संस्कृतीच्या देवाण-घेवाणीतून जगभर पसरली. विशेषतः रेशीम मार्ग आणि समुद्री व्यापारामुळे ही कथा अनेक देशांत पोहोचली.
Ans: बौद्ध साहित्यात (जातक कथा), जैन साहित्यात, शीख धर्मग्रंथांमध्ये, देखील वेगवेगळ्या स्वरूपात आढळते.
Ans: श्रीराम कथा अनेक देशांच्या नृत्य-नाट्य, चित्रकला, साहित्य, राजकीय परंपरा यावर मोठा प्रभाव टाकते.






