फोटो सौजन्य- pinterest
वल्लभाचार्य एक महान कृष्णभक्त होते. त्यांची असंख्य स्त्रोत कृष्णभक्तीची गोडी वाढवते. पुष्टीमार्गाचे संस्थापक आणि महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी होते. साक्षात भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिला असे सांगितले जाते. हे वल्लभाचार्य नक्की कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला. जाणून घेऊया
वल्लभाचार्य जयंती (श्री महाप्रभूजी) चैत्र कृष्ण एकादशीला साजरी केली जाते, जी हिंदू भक्ती चळवळीतील पुष्टीमार्गाचे संस्थापक आणि महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी श्री वल्लभाचार्य यांचा जन्म चैत्र कृष्ण एकादशी (वरुथिनी एकादशी) दिवशी, इ.स. १४७९ (विक्रम संवत १५३५) मध्ये वाराणसीजवळील चंपारण्य (काही संदर्भानुसार, मूळ तेलगू ब्राह्मण कुटुंब) येथे झाला. वल्लभाचार्य यांनी ‘शुद्धाद्वैत’ सिद्धांताचा प्रसार केला आणि श्रीनाथजींच्या भक्तीचा मार्ग दाखवला. वल्लभाचार्य हे भक्ती चळवळीतील एक थोर संत आणि महान कृष्णभक्त म्हणून ओळखले जातात.
वल्लभ पंथ, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय, पुष्टिमार्ग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या एका भक्तीमार्गी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक. ते तेलुगू ब्राह्मण होते. त्यांचे घराणे आंध्र प्रदेशातील कांकरव नावाच्या गावचे. कंकर खम्ल्ह, कांकरवाड ही याच गावाची पर्यायी नावे. वल्लभाचार्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणभट्ट आणि आईचे इल्लमगरू. गणपतीभट्ट हे त्यांचे आजोबा आणि गंगाधरभट्ट हे पणजोबा. वल्लभाचार्यांचे घराणे सोमयाजी असून त्यांच्या घराण्यातील पुरुषांनी 100 सोमयज्ञ केले होते, असे म्हणतात. इ.स. १४७९ हे वल्लभाचार्यांच्या जन्माचे वर्ष मानले जात असले, तरी आख्यायिका असे सांगते की, लक्ष्मणभट्ट आपल्या कुटुंबियांसह वाराणसी (काशी) येथे असताना त्या शहरावर इस्लामी आक्रमण होणार, अशा वार्ता कानांवर येऊ लागल्या; त्यामुळे घाबरून लक्ष्मणभट्ट काशी सोडून अन्यत्र निघाले. वाट मध्य प्रदेशातील रायपूर जिल्ह्याच्या एका रानातून जात होती. या रानाचे नाव होते ‘चंपारण्य’. या रानातच इल्लमगरू प्रसूत होऊन तिच्या पोटी वल्लभाचार्यांचा जन्म १४८१ साली झाला.
वल्लभाचार्य आठ वर्षांचे होताच त्यांच्या वाडिलांनी त्यांचे उपनयन करून विष्णुचित्तनामक गुरुंकडे त्यांना अध्ययनार्थ पाठविले. वेदांचे अध्ययन त्यांनी अनेक गुरूंकडे केले. त्रिरम्मलय, अंधनारायण दीक्षित आणि माधवयतींद्र याचा यात समावेश होतो. हे सर्व माध्वमताचे होते; दरम्यान वल्लभाचार्यांना मात्र माध्वमत मान्य नव्हते. त्यांचा पंथ अद्वैती आहे. भागवत, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. १४८९ साली आपले अध्ययन पूर्ण करून ते घरी परतले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी निघाले असता तिरुपती येथे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यात्राकालात त्यांनी काशी व जगन्नाथपुरी येथील अनेक विद्वानांशी वादविवाद केला आणि ते वल्लभाचार्य म्हणून मान्यता पावले.
देवदमन वा श्रीनाथजी या रूपाने गोवर्धन पर्वतावर प्रकट होऊन श्रीकृष्णाने वल्लभाचार्यांना दृष्टान्त दिला आणि कृष्णमंदिर बांधून नवा भक्तिसंप्रदाय सुरू करण्यास सांगितले, अशी पुष्टिमार्गाच्या अनुयायांची श्रद्धा आहे.
वल्लभाचार्यांचे तत्त्वज्ञान ‘शुद्धाद्वैत’ या नावाने ओळखले जाते. वल्लभाचार्यांचा संप्रदाय नवा असला, तरी त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञान त्यांनी विष्णुस्वामींच्या रुद्र संप्रदायातून घेतले. अग्नीपासून स्फुल्लिंग निघावेत, तसे ईश्वरापासून जीव निघतात. जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून ईश्वर व जीव या दोघांत अद्वैत असते; ब्रह्म हे मायासंबंधरहित शुद्ध आहे, ही या तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आहेत.
पुष्टिमार्गातील भक्तीचे स्वरूप पाहता त्याचे अनुयायी श्रीकृष्णाला सर्वोच्च ब्रह्म मानतात. श्रीकृष्ण हा कर्ताही आहे; भोक्ताही आहे. स्वतःच्या इच्छेने तो जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय.
वल्लभाचार्यांनी ८४ ग्रंथ रचिले, असे म्हणतात; दरम्यान त्यांच्या नावावर ३१ ग्रंथच असल्याचे दिसते. त्यांत विशेष महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे भागवतपुराणावरील सुबोधिनी ही टीका, तत्त्वार्थदीप अथवा तत्त्वदीपनिबंध, ब्रह्मसूत्र-अणुभाष्य, जैमिनीभाष्य आणि षोडशग्रंथ हे होत. षोडशग्रंथ हा १६ ग्रंथांचा एक समूह आहे. त्यात यमुनाष्टक, बालबोध, सिद्धांतमुक्तावली, पुष्टिप्रवाहमर्यादाभेद, सिद्धांतरहस्य, नवरत्न, अंतःकरणप्रबोध, विवेकधैर्याश्रय, कृष्णाश्रय, चतुःश्लोकी, भक्तिवर्धिनी, जलभेद, पंचपद्य, संन्यासनिर्णय, निरोधलक्षण आणि सेवाफल याचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी मधुराष्टक, श्रीकृष्णाष्टक, गोपीजन-वल्लभाष्टक, अशी काही अष्टकेही लिहिली आहेत.
वल्लभाचार्यांनी अनेकदा तीर्थयात्रा केल्या. त्या करीत असताना त्यांनी आपल्या नव्या पंथाचाही प्रचार केला. त्यांना अनेक शिष्य लाभले. दामोदर, शंभू, स्वभू, स्वयंभू, कृष्णदास अधिकारी, कुंभन दास, परमानंद दास, सद्दू पांडे, रामदास चौहान, कृष्णदास यांचा त्यात समावेश केला जातो. अंधकवी आणि कृष्णभक्त सूरदास यांनीही त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वल्लभाचार्य हे महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी आणि पुष्टीमार्गाचे संस्थापक होते.
Ans: पुष्टीमार्ग हा श्रीकृष्ण भक्तीवर आधारित एक वैष्णव संप्रदाय आहे, ज्याची स्थापना वल्लभाचार्यांनी केली.
Ans: त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सर्वोच्च मानून त्यांची भक्ती केली.






