“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते”
नवरात्र म्हणजे देवीचा जागर ! नऊ दिवस देवी आईच्या वेगवेगळ्या रुपाची केली जाणारी पूजा. कधी चंद्रघंटा कधी शैलपुत्री कधी अंबिका या अशा विविध रुपांची आराधना आणि महात्म्य या नवरात्रीत सांगितलं जातं. त्यातीलच देवीचं रौद्ररुप म्हणून जिला पाहिलं जातं म्हणजे काळरात्री देवी. काळसर निळा वर्णाची, चेहऱ्यावर रौद्रभाव, डोळ्यात अंगार असं हे देवी पार्वती रुप म्हणजे काळरात्री देवी. रथसप्तमीला या देवीला विशेष महत्व दिलं जातं. काळरात्रीचा जागर आणि तिच्या पूजेबाबत अनेक गूढ आहेत. मुंबईतल्या एका प्रसिद्ध ठिकाणी या देवीचा जादर उत्सव केला जातो. अनेक भक्तांच्या अंगात येणारं वारं इथे शांत करण्यात येतं असा समज आहे. हा काळरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.
मुंबईतलं हे असं एक ठिकाण ज्याचं नवरत्रीत रुपच पालटलेलं असतं. या ठिकाणी होणाऱ्या काळरात्रीचा उत्सव अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. हे ठिकाण म्हणजे घाटकोपरमधील भटवाडी. भटवाडीच्या महाकालीचा उत्सव मुंबईत प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक रिल्स व्हायरल होत आहेत.
माता महाकाली सेवा मंडळ संचलित अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतं. घाटकोपर पश्चिम भटवाडी स्थित “श्री क्षेत्र माता महाकाली मंदिर” हे मुंबईतील प्राचीन व जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. फार पुर्वी श्रीमहाकालीच्या साक्षात्कारानंतर सद्गुरू श्री स्वामी शामानंदांनी या मंदिराची उभारणी केली होती. इथल्या जुन्या जाणत्या स्थानिक रहिवाशांच्या माहितीप्रमाणे शंभराहून अधिक वर्ष या मंदिराचा आणि त्याचसोबत रुढी-परंपरा विधी उत्सवाचा इतिहास आहे.
सद्गुरू श्री स्वामी शामानंदांनी सुरु केलेल्या शारदीय नवरात्रौत्सव, मकरसंक्रांत व इतर धार्मिक विधी अनुष्ठानाची परंपरा आजही इथे संपुर्ण श्रद्धेने जोपासली जाते. शारदीय नवरात्रौत्सवातील काळरात्र उत्सव हा सर्व भावीकांचा विशेष लक्षवेधी उत्सव म्हणून प्रख्यात आहे. नवरात्रौत्सवाच्या महासप्तमी दिनी मध्यरात्री ठिक बारा वाजता हा विधी संपन्न होतो. नवरात्रातील महासप्तमी दिनी सायंकाळी आई महाकालीचे हवन अनुष्ठान संपन्न होते.
सांज आरती संपन्न झाल्यावर लगबग सुरु होते ती काळरात्र उत्सवाची. मध्यरात्री ठिक बारा वाजता मंदिर प्रांगणात गडद अंधार केला जातो. आई महाकाली तथा क्षेत्र रक्षक श्री वेताळ यांचीपूजा केली जाते. त्याचबरोबर एक महत्वाचा विधी होतो तो म्हणजे कोहळा बलिदान विधी. लोक कल्याणार्थ श्रीमहाकालीला साकडं घातलं जातं आणि रथसप्तमीला तिचा जागर केला जातो.
भुत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलं यज्ञ मंडपाजवळ सुसज्ज होतात. आणि ठिक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातून प्रज्वलित दिवट्या हाती घेऊन पुरुष सदस्य बाहेर पडून यज्ञ मंडपाकडे धाव घेतात व वाजत गाजत दिवट्या नाचवत यज्ञ मंडपाला प्रदक्षिणा घालतात. सोबतच भुत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलंही त्यात सामील होतात. अंगी शिवकळा संचार झालेले असंख्य भाविक स्री पुरुष यज्ञ मंडपात वारे खेळतात. हा विधी पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. ठराविक वेळेनंतर पुन्हा सर्वत्र प्रकाश रोशनाई होते. अंती आदिशक्ती आई महाकालीचा जयजयकार होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते.या उत्सवात देवीला आवाहन केलं जातं. होम हवन करुन देवीला प्रसन्न केलं जातं.
या उत्सावासाठी येणाऱ्य़ा भाविकांसाठी मंडळाकडून देखभाल केली जाते. त्यांना हवं नको ते पाहिलं जातं. अशी धारणा आहे की इथे भाविकांच्या अंगात देवीचं वारं येतं. ते वारं शांत झाल्यावर या भाविकांना मंडळाचे सेवेकरी सुरक्षितपणे धरी पोहोचवतात. हे जागृत देवस्थान असल्या कारणाने या देवस्थानाची ख्याती मुंबईभर पसरलेली आहे. मात्र असं असलं तरी या ठिकाणी तंत्र मंत्र, काळी जादू किंवा जादू टोणा सारख्य़ा प्रकारांना थारा दिला जात नाही. केवळ काळरात्री देवीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी येत्या रविवारी रथसप्तमीला काळरात्रीचा देवीचा जागर करण्यात येणार आहे.