पेशव्यांचे सरदार असलेल्या आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यामध्ये आजही संगीतमय गणेशोत्सव साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रिती माने : पुण्यामधील वाडा संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय आहे. वाड्यांमध्ये साजरे होणारे सण उत्सव हे परंपरेची सांगड घालत असतात. असाच सरदार मुजुमदार यांचा वाडा पारंपारिक सणांची साक्ष देत आहे. शेकडो वर्षांपासून या वाड्यामध्ये गणरायाची विधीवत पूजा केली जात असून सांस्कृतिक ठेवा जपला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कसबा पेठेमध्ये हा सरदार मुजुमदार यांचा वाडा आहे. पेशव्यांचे सरदार असलेल्या आबासाहेब मुजुमदार यांच्या दफ्तराचे अनेक पुरावे, संग्रहीत वस्तू आणि पितळी विविध सामान, भांडी आणि वाद्य अशा वैभवाने सजलेल्या या मुजूमदार वाड्यामध्ये गणेशोत्सवाची आगळी वेगळी परंपरा आहे. मुजुमदार वाड्यामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणेशोत्सव सुरु होतो ते ऋषिपंचमीपर्यंत राहतो. किर्तनमाला, गणेशोमंत्र आणि गणेश महालातील मंत्रमुग्ध करणारी सूरमयी सेवा थेट पेशवे काळातील गणेशोत्सवामध्ये घेऊन जाते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुजुमदार यांच्या देवघरामध्ये असणारी गणरायाची मूर्ती ही वाजत गाजत गणेश महलामध्ये आणली जाते. मुजुमदार वाड्यातील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या गणेश महालामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणेश महालातील मयूर सिंहासनावर गणरायाला विराजमान केले जाते. लाकडी कमानींचा आणि झुंबर लावलेला गणेश महल अतिशय लोभसवाना आहे. मुजुमदार यांचा गणपती देखील मातीचा नाही तर पारंपारिक पद्धतीचा आहे. गणरायाची मूर्ती पंचधातूंची असून अतिशय सूबक आणि रेखीव आहे.
मुजुमदार वाड्यातील हा गणराय वल्लभेष गणपती म्हणून ओळखला जातो. पंचधातूची ही मूर्ती दशभूजा आहे. प्रत्येक हातामध्ये विविध आयुधे असून मांडीवर वल्लभा बसलेली आहे. त्यामुळे या मूर्तीला वल्लभेष गणपती म्हणतात. गणरायाला पितळी कमळामध्ये बसवण्यात आले असून डोक्यावर नाग आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणरायाला लाकडी मखरामध्ये विराजमान करण्यात येते. सागवानी लाकडामध्ये तयार करण्यात आलेल्या मयुरेश्वर सिंहासनावर बसवण्यात येते.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सव अनेक वर्षांपासून सूरमयी सोहळा राहिला आहे. विविध कलावंताची संगीत सेवा या वाड्यामध्ये पार पडली आहे. यामध्ये बडे गुलाम अलीखॉं अमानत अली खॉं, सवाई गंधर्व, बालगंधर्व, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी अशा अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर किर्तनसेवा, सनईवादन देखील केले जाते. आजही ही परंपरा कायम आहे. गणेशोत्सावाच्या काळामध्ये मुजुमदार वाड्यामध्ये किर्तनाचे सूर ऐकू येतात. वाड्याचे वातावरण अतिशय मंत्रमुगध करुन टाकते. पुणे शहर जसे वाढत गेले तशा परंपरा लोप पावत गेल्या. मात्र आजही मुजुमदार यांची पुढची पिढी गणेशोत्सवाची ही अनोखी परंपरा जपत आहे. डीजेच्या आवाजामध्ये आजचा गणेशोत्सव हरवला असला तरी मुजुमदार वाडा हा कीतर्नसेवा, सनईचे निनाद, विणाचे सूर, आरतीची थाप असा कायम संगीतमय राहिला आहे. मुजुमदार यांचा गणेशोत्सव त्यांची पुढची पिढी आजही जपण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाच्या उत्सवाचे 311 वे वर्षे असून आजही ही परंपरा जपली जात आहे. आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार या सर्व जबाबदारी सांभाळत आहे.