९ महिन्यांत २८,००० हून अधिक भूकंप; वारंवार होणाऱ्या भूकंपांमागचे शास्त्रीय कारण उघड ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
फक्त ९ महिन्यांत २८,००० हून अधिक भूकंप : ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर मोठी भूवैज्ञानिक हालचाल.
कारण उघडकीस : पृथ्वीच्या आतून वर येणाऱ्या मॅग्मामुळे खडक फुटून मार्ग तयार झाले आणि त्यामुळे वारंवार भूकंप झाले.
शास्त्रज्ञांचा इशारा : भविष्यात या प्रदेशात पुन्हा मोठा ज्वालामुखी उद्रेक होण्याची शक्यता.
Earthquake swarm Santorini : ग्रीसच्या( Greece) सुंदर आणि ऐतिहासिक सॅंटोरिनी बेटाने गेल्या नऊ महिन्यांत अक्षरशः हजारो वेळा हादरे सोसले. २८,००० हून अधिक भूकंप (Earthquake) या छोट्याशा बेटाने अनुभवले आणि त्यामुळे स्थानिकांपासून ते जगभरातील शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांचीच चिंता वाढली. अखेर शास्त्रज्ञांनी सखोल तपासणीनंतर यामागचे खरे कारण उघड केले आहे.
GFZ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेतील भूभौतिकशास्त्रज्ञ डॉ. मारियस इस्केन यांनी “नेचर” जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात सांगितले की, हे सर्व भूकंप पृथ्वीच्या आत खोलवर असलेल्या मॅग्माच्या हालचालींमुळे झाले.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अंदाजे ३०० दशलक्ष घनमीटर मॅग्मा वर सरकला.
वर येताना मॅग्माने खडक फोडले, नवीन मार्ग तयार केले.
या प्रक्रियेमुळे सलग भूकंप होत राहिले आणि लोकांना मोठा धोका जाणवला.
या तपासणीसाठी शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक भूकंप मोजणी उपकरणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर केला. सॅंटोरिनीपासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या कोलंबो या पाण्याखालील ज्वालामुखीजवळ विशेष उपकरणं बसवण्यात आली होती. तेथून मिळालेल्या डेटाचा अभ्यास करून मॅग्माची हालचाल नेमकी कशी होत आहे याचा स्पष्ट अंदाज आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jwalamukhi Temple : देवीच्या ‘या’ मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे ‘ही’ अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ
सॅंटोरिनी हा भाग आधीपासूनच भूगर्भीय दृष्ट्या संवेदनशील आहे.
येथे असंख्य फॉल्ट लाईन्स (भूकंपीय फटी) आहेत.
भूमध्य समुद्राखालील टेक्टोनिक प्लेट्स सतत हालचाल करतात, एकमेकांवर आदळतात.
या सबडक्शन प्रक्रियेमुळे वारंवार ज्वालामुखी क्रियाकलाप घडतात.
१९५६ साली या भागात एकाच वेळी दोन भीषण भूकंप झाले होते एक रिश्टर स्केलवर ७.४ तर दुसरा ७.२ इतका. त्यावेळी झालेल्या धक्क्यामुळे त्सुनामी आली होती. त्यामुळे या प्रदेशातील लोक भूकंपांबाबत अधिक सजग आहेत.
तज्ञांच्या मते ही प्रक्रिया जुलै २०२४ पासून सुरू झाली. त्या वेळी मॅग्मा सॅंटोरिनीच्या खालील एका उथळ थरात जमा होऊ लागला. पुढे जानेवारी २०२५ मध्ये तो अजून वर सरकला आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर भूकंप घडले. सुरुवातीला केंद्र १८ किलोमीटर खोल होते, परंतु सततच्या हालचालीमुळे ते फक्त ३ किलोमीटरवर आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा
इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या कमी कालावधीत भूकंप होणे हे नक्कीच चिंतेचे आहे. स्थानिक लोक घराबाहेर रात्री झोपणे पसंत करत आहेत, तर पर्यटन उद्योगालाही मोठा धक्का बसला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ सॅंटोरिनीवर लक्ष ठेवून आहेत कारण या हालचाली भविष्यातील मोठ्या ज्वालामुखी उद्रेकाचे संकेत असू शकतात. वारंवार होणाऱ्या भूकंपामागे केवळ टेक्टोनिक प्लेट्स नव्हे, तर पृथ्वीच्या गर्भातून वर सरकणारा मॅग्मा हे खरे कारण असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आता प्रश्न आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणावर वर आलेला मॅग्मा पुढे काय करणार? – हा भूगर्भीय प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.