Explainer: एका मोठ्या अणुयुद्धाकडे जगाची वाटचाल..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक घोषणेचा असाही परिणाम?
World War III: ३० ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अनपेक्षित घोषणेने संपूर्ण जग हादरले आहे. ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी, पेंटागॉनला ३३ वर्षांनंतर अणुशस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्यापार चर्चेपूर्वी केलेल्या ट्रम्पच्या घोषणेने जागतिक तणाव वाढला आहे. परंतु, हे पाऊल अणुशस्त्रांच्या प्रसाराला चालना देईल आणि जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलू शकेल. असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रशियाने २१ ऑक्टोबर रोजी १४ हजार किलोमीटर अंतरावर आणि १५ तास हवेत राहणाऱ्या अणु-सक्षम ‘बुरेव्हेस्टनिक’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याबाबत केलेली घोषणा जागतिक स्तरावर खळबळजनक ठरली आहे.
मॉस्कोने या चाचणीला “राष्ट्रीय सुरक्षेचा भाग” म्हटले असून त्यानंतर ‘पोसायडॉन’ अणु ड्रोनची चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली. हा ड्रोन रशियाच्या ‘सरमॅट’ क्षेपणास्त्रापेक्षा हजारपट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांच्या घोषणेला रशियाच्या या हालचालींची प्रेरणा असल्याचे मानले जात आहे.
क्रेमलिनने ट्रम्पच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, जर अमेरिकेने प्रत्यक्ष अणुचाचणी केली, तर रशिया “योग्य प्रत्युत्तरात्मक उपाय” करेल. तर इराण आणि चीन यांनी मात्र ट्रम्प यांच्या या घोषणेवर चीनने मौन राखले आहे. तथापि, त्यांच्या अणुसाठ्याच्या विस्तारावरील वृत्तांमुळे तणाव आणखी वाढला आहे.
१९४५ ते १९९६ दरम्यान अमेरिकेने १,००० हून अधिक अणुचाचण्या केल्या होत्या. १९९२ मध्ये स्वेच्छेने स्थगिती लागू करण्यात आली आणि १९९६ मध्ये ‘व्यापक अणुचाचणी-बंदी करार’ (CTBT) वर स्वाक्षरी झाली, मात्र अमेरिकेने तो मंजूर केला नाही. १९९० नंतर उत्तर कोरिया व्यतिरिक्त कोणत्याही देशाने प्रत्यक्ष स्फोटक चाचणी केलेली नाही.
ट्रम्पची घोषणा राजकीयदृष्ट्या स्फोटक मानली जात आहे. नेवाडा चाचणी स्थळ पुनर्बांधणीस अनेक वर्षे लागू शकतात, तरीही हा निर्णय अणुशस्त्र स्पर्धा पुन्हा पेटवू शकतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या २०२५ च्या अहवालानुसार, दुर्बल होत चाललेल्या शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणालीमुळे नव्या अणुयुगाची चिन्हे दिसत आहेत.
शीतयुद्धानंतर अण्वस्त्रांची संख्या ७० हजारांवरून १२,२४१ इतकी कमी झाली असली तरी अमेरिका आणि रशिया या दोघांकडे एकूण ९०% अण्वस्त्रे आहेत. रशिया: ५,५८०, अमेरिका: ५,०४४, चीन: २०३० पर्यंत १,००० अण्वस्त्रे निर्माण करण्याचे लक्ष्य, संयुक्त राष्ट्रांच्या सप्टेंबर २०२५ च्या अहवालानुसार, युक्रेन युद्ध, तैवान संकट आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक अणुसंतुलनाचा धोका वाढत आहे.






