धुळ्यातील ऐतिहासिक भुयारेश्वर गणपती मंदिर अतिशय वेगळा आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Ganeshotsav 2025 : धुळे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. राज्यातील विविध भागामध्ये अनेक अद्भूत आणि परंपरा असणाऱ्या गणपती आहेत. असाच एक शिरपूर तालुक्यातील भूयारामधील गणपती आहे. मांजरोद गावात तापी नदीच्या काठावर वसलेले भुयारेश्वर गणपती मंदिर म्हणजे एक अद्भुत व ऐतिहासिक धार्मिक स्थळ होय. भुयारात असलेली गणपतीची मूर्ती अनोख्या वैशिष्ट्यांमुळे केवळ भाविकांचाच नाही तर इतिहासप्रेमी व संशोधकांचाही अभ्यासविषय बनली आहे.
मंदिराला भुयाराचे स्वरूप
मांजरोद गावात असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी साधारण ७० मीटर लांब भुयारातून आत जावे लागते. भुयाराची उंची सुमारे ८ फूट तर रुंदी ४ फूट इतकी आहे. आतमध्ये दोन खोल्या असून त्यापैकी एका खोलीत श्री गणेश विराजमान आहेत. या गुप्त भुयारात प्रवेश करताना पूर्ण अंधार जाणवतो, मात्र छतावरील छोट्या फटींमधून पडणाऱ्या प्रकाशकिरणामुळे वातावरण गूढ व दिव्य वाटते.
गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य
या मंदिरात असलेली भुयारेश्वर गणपतीची मूर्ती साधारण दोन फूट उंच आहे. मूर्ती पंचामृताची असल्याचे सांगितले जाते. तिच्या आत कापूस भरलेला असून, मूर्तीला दाबल्यास ती किंचित मऊ भासते तर ठोठावल्यावर आवाजही निर्माण होतो. ही एक विलक्षण गोष्ट असल्याने भाविक नेहमीच अचंबित होतात. मूर्तीवर शेंदूर लावलेला असून तिच्या डोळ्यांना चांदीची सजावट केलेली आहे. गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे. विशेष म्हणजे, या मूर्तीचे साम्य मोरगावच्या प्रसिद्ध मयुरेश्वर गणपती मूर्तीशी आढळते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऐतिहासिक संदर्भ व कथाकथन
भुयाराचा नेमका इतिहास ठामपणे सांगता येत नसला तरी स्थानिकांच्या मते ते शिवकालीन आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या भुयारात स्वातंत्र्यवीरांनी आश्रय घेतल्याचे उल्लेख आहेत. मंदिराजवळच विहीर तसेच आत्माराम बाबा यांची समाधी असून, याच परिसरात पूर्वी कीर्तन, भजन, विवाहसोहळे व विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रम पार पडत असत. भुयारेश्वर मंदिराच्या वरून दूरवर कपिलेश्वर मंदिर (मुडावद, ता. शिंदखेडा) देखील दिसते.
धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
मांजरोद गाव व परिसरातील ग्रामस्थांसाठी हे मंदिर प्रचंड श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी गणेशोत्सवात तसेच इतर धार्मिक उत्सवात येथे भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. मूर्तीची अनोखी रचना, भुयारातील शांत व दिव्य वातावरण आणि इतिहासाशी जोडलेल्या कथा यामुळे हे देवस्थान धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. भुयारेश्वर गणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, शिरपूर तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे. भाविकांच्या श्रद्धा, इतिहासाच्या आठवणी आणि गूढतेचा संगम असलेले हे मंदिर आजही ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्यातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मांजरोद येथील भुयारेश्वर देवस्थान सेवा समितीकडून भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा
तालुक्यातील प्राचीन व प्रसिद्ध भुयारेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी भुयारेश्वर देवस्थान सेवा समिती तर्फे अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून लहान-मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉलची सुविधा देखील निर्माण करण्यात आली आहे. दरवर्षी मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी भुयारेश्वर मंदिरात येत असतात. वाढत्या गर्दीचा विचार करता पिण्याचे पाणी, पार्किंग, स्वच्छता आदी मूलभूत सोयींचीही काळजी समितीमार्फत घेतली जात आहे. मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांना अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वजण अथक प्रयत्न करत आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा धार्मिक परिसर सातत्याने समृद्ध होत असून भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे, अशी माहिती मांजरोदचे ग्रामस्थ शाम पाटील यांनी दिली आहे.