जगभरातील चर्चवर नियंत्रण, जागतिक नेत्यांना सल्ला, किती शक्तीशाली असतं पोपचं पद? वाचा सविस्तर
ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं ८८ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून आजारी होते. दीर्घकाळ रुग्णालयात उपचार सुरू होते. पोप फ्रान्सिस इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरु होते, ज्यांनी आपली विनम्र शैली आणि गरीबांविषयी आपुलकी यामुळे जगभरात लोकप्रियता मिळवली. त्यांच्या तारुण्यात त्यांच्या एका फुफ्फुसाचा काही भाग काढण्यात आला होता. ते फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. दरम्यान ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोपवर कोणती जबाबदारी असते? हे पद किती शक्तीशाली असतं? जगातील सर्व चर्चवर नियंत्रण असतं का? जागतिक नेत्यांना सल्ला देऊ शकतात का? सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया…
Pope Francis Journey: ‘असा’ आहे पोप फ्रान्सिस यांचा शिक्षक ते धार्मिक गुरु बनण्यापर्यंतचा प्रवास
पोप हे ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु मानले जातात आणि त्यांच्याकडे धार्मिक, प्रशासकीय, राजकीय आणि सांस्कृतिक जबाबदारी असते. आधुनिक काळात काही मर्यादा असल्या तरी त्यांच्या अधिकारांची व्याप्ती मोठी असते. संपूर्ण जगातील १.४ अब्जाहून अधिक कॅथोलिकांचे आध्यात्मिक नेतृत्व करतात. पोप हे कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि विश्वास, नैतिकता व धार्मिक शिकवण यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो.
व्हॅटिकन सिटी एक स्वतंत्र राष्ट्र असून पोप त्याचे शासक असतात. त्यांच्या हातात कार्यकारी, कायदे आणि न्यायिक सर्व अधिकार असतात. ते व्हॅटिकनचे प्रशासन, अर्थकारण आणि परराष्ट्र धोरण नियंत्रित करतात. याशिवाय, जगभरातील बिशप आणि कार्डिनल यांच्या नियुक्त्या पोप करतात. त्यामुळे चर्चच्या स्थानिक आणि जागतिक कारभारावर त्यांचा प्रभाव मोठा असतो. त्यामुळे त्यांच्याकडे चर्चच्या दिशादर्शनाची मोठी ताकद असते.
व्हॅटिकनमधील सर्व संस्था पोपच्या नियंत्रणाखाली असतात. व्हॅटिकनचे विविध विभाग (काँग्रेगेशन, कौन्सिल) आणि आर्थिक संस्था जसे की व्हॅटिकन बँक यावर पोपचा निर्णय अंतिम मानला जातो. संपूर्ण जगात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पोपकडे थेट लष्करी किंवा आर्थिक शक्ती नसली, तरी त्यांची नैतिक आणि अध्यात्मिक ताकद त्यांना जागतिक व्यासपीठावर एक प्रभावी नेता बनवते. ते जागतिक नेत्यांशी भेटतात आणि शांतता, पर्यावरण, सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर प्रभाव टाकतात.
व्हॅटिकनचे १८० हून अधिक देशांशी राजनैतिक संबंध आहेत आणि पोप हे या संबंधांचे केंद्रबिंदू असतात. मध्यस्थी आणि शांतता चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये क्यूबा-अमेरिका संबंध सुधारण्यात पोप फ्रान्सिस यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय पोपचे निवेदन आणि पत्र (एन्सायक्लिकल्स) सरकारांवर व समाजावर नैतिक दबाव टाकू शकतात. हवामान बदल किंवा सामाजिक विषमतेवर त्यांनी लिहिलेल्या लेखांचा मोठा प्रभाव पडतो.
Pope Francis Death: पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन; अब्ज कॅथलिकांनी व्यक्त केला शोक
पोप यांच्या विधानांना जागतिक पातळीवर मोठं महत्त्व असतं. पोप फ्रान्सिस यांची साधी राहणी आणि सामाजिक मुद्द्यांवरील प्रगतिशील भूमिका यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. पोप यांना जगभरात करुणा, दया आणि ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. विविध धर्म आणि संस्कृतींमधील संवादाला चालना देतात.
पोप यांची शक्ती धार्मिक व नैतिक क्षेत्रात सर्वाधिक प्रभावशाली असते, जी जागतिक कॅथोलिक समुदायासह इतर समाजावरही परिणाम करते. प्रशासकीयदृष्ट्या, ते व्हॅटिकन आणि चर्चचे सर्वोच्च प्रमुख असतात. राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या त्यांची सत्ता अप्रत्यक्ष पण खोलवर प्रभाव करणारी असते, जी नैतिक नेतृत्व आणि जागतिक मुत्सद्देगिरीतून येते. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या साधेपणामुळे आणि सामाजिक प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करून या शक्तीचा आधुनिक काळात अधिक प्रभावी वापर केला होता.






