Otari Community Create And Shaping Metalwork Ahilyanagar Pune Navarashtra Special Story
पितळी टाळ ते मूर्तीपर्यंतचा प्रवास! कलाकृती साकारणाऱ्या समाजाला ‘ओतारी’ नाव का पडले?
बाबुराव ओतारी, हे कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कारागीर आहेत. त्यांनी आपल्या हातातल्या कौशल्याच्या माध्यमातून ओतारी समाजाची प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे.
पुणे/प्रगती करंबेळकर: एकेकाळी मराठेशाहीच्या तोफा ओतणाऱ्या हातांनी आजही देवघरातील मूर्ती साकारल्या जातात. ओतारी समाजाची पारंपरिक धातुकला आज आधुनिकतेच्या स्पर्धेतही तितकीच परिणामकारक आहे. ती केवळ टिकलीच नाही, तर संस्कृतीच्या संवर्धनाचे प्रतीक बनली आहे. पितळ, लोह, कांस्य यांसारखे धातू ओतण्याच्या व्यवसायामुळेच या समाजाला ‘ओतारी’ हे नाव लाभले.
धातू वितळवून त्यातून नव्या रूपात कलाकृती साकारण्याची कला ही केवळ कौशल्याची बाब नाही. ती इतिहास, परंपरा आणि सामाजिक ओळखीचा भाग आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेला, पण धातुकलेच्या या प्राचीन परंपरेशी नातं जोडलेला ओतारी समाज आजही आपली कला जपत आहे. अहिल्यानगर येथे तयार होणाऱ्या पितळी टाळांना राज्यभरातून विशेष मागणी असते.
मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि बाजारपेठेतील मोठ्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे या पारंपरिक कलेला मागणी असूनही हक्काचा मंच नाही. त्यातच अनेक कारागीर सांगतात, “जेव्हा मूर्ती प्रसिद्ध होते, तेव्हा तिचा कलाकार दुर्लक्षित राहतो.”
याच पार्श्वभूमीवर, ओतारी समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश वांद्रे यांच्याशी संवाद साधला त्यांच्या म्हणण्यानुसार ओतारी समाज संघटना विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून, कला आणि कलाकारांचा सन्मान करणं, नव्या पिढीत कला रुजवणं, आणि समाजाची सांस्कृतिक एकता जपणं या त्रिसूत्रीवर कार्य करत आहे.
ते पुढे म्हणाले आजही या समाजाचे अनेक सदस्य वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मात्र पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी सरकारी स्तरावर विशेष पाठबळाची आवश्यकता आहे.
‘कालिका माता उत्सव – समाजसंघटन आणि कलेचा महाउत्सव’
कासारवाडी येथील कालिका माता मंदिर हे ओतारी समाजाचं श्रद्धास्थान आहे. याच मंदिराचा १०३ वा वर्धापन दिन यंदा ९ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा दिवस ओतारी समाजासाठी केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक एकतेचा, परंपरेच्या अभिमानाचा दिवस आहे.
याच दिवशी “समाजभूषण पुरस्कार” वितरण सोहळा पार पडतो. यंदा या पुरस्कारासाठी तब्बल २३० अर्ज प्राप्त झाले असून, पारंपरिक धातुकलेत योगदान देणाऱ्या निवडक कलाकारांचा गौरव केला जाणार आहे.
ओतारी समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश वांद्रे यांच्या म्हण्यानुसार, “समाजभूषण पुरस्काराचे माध्यमातून ओतारी समाजातील कारागीरांना प्रोत्साहन देण्याचे या सोहळ्याचे उदिष्ट आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून ओतारी समाजबांधव कासारवाडीत एकत्र येतात. या दिवशी भव्य कलापथक मिरवणूक,पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण, आणि हस्तकलेच्या प्रदर्शनांमधून समाजाचा सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडला जातो.”
ओतारी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्ती
ओतारी समाजाच्या सांस्कृतिक आणि व्यवसायिक उन्नतीमध्ये अनेक व्यक्तींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामध्ये गंगाधर वंधारे, बाबुराव ओतारी आणि शामराव ओतारी यांचा विशेष उल्लेख मुकेश वांद्रे यांनी केला.
गंगाधर वंधारे हे शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या वस्तू तयार करण्यात विशेष पारंगत आहेत. शासकीय कार्यालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये तिरंग्यासाठी लागणाऱ्या धातूच्या वस्तूंची निर्मिती ते अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कारागिरीमुळे ओतारी समाजाच्या परंपरेला अधिक व्यापक मान्यता मिळाली आहे.
बाबुराव ओतारी, हे कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कारागीर आहेत. त्यांनी आपल्या हातातल्या कौशल्याच्या माध्यमातून ओतारी समाजाची प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे. पारंपरिक ओतकामाला त्यांनी आधुनिकतेची जोड देत स्थानिक आणि राज्यस्तरावर ओतारी कलेचं महत्त्व जपलं आहे.
शामराव ओतारी हे केवळ ओतकामातच नव्हे तर सूक्ष्म नक्षीकामात ही तितकेच कुशल आहेत. चांदी आणि इतर धातूंवरील त्यांच्या बारीक नक्षीकामामुळे त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या कलेचा ठसा आजही अनेक पूजावस्तूंमध्ये आणि शिल्पांमध्ये दिसून येतो.
Web Title: Otari community create and shaping metalwork ahilyanagar pune navarashtra special story